ठाणे : कार्टूनिस्ट कंबाईन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनानिमित्ताने सर्व सामान्य माणसाला व्यंगचित्रकलेची ओळख व्हावी, या हेतूने शाळा-शाळांमध्ये व्यंगचित्रकार जाऊन कार्यशाळा घेणार आहेत. यात प्रामुख्याने शाळा मुख्याध्यापक आणि कला शिक्षक यांच्याशी संवाद साधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष विवेक मेहेत्रे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार, २० आणि रविवार २१ असे दोन दिवस संमेलन ज्ञानदेव सभागृह व कचराळी तलाव या दोन ठिकाणी होणार आहे. संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर हेही यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मेहेत्रे यांनी दिली. पहिल्यांदा मुली, महिला, तसेच सर्व वयोगटासाठी विनामूल्य व्यंगचित्र कार्यशाळा घेण्यात येणार आहे. देश-विदेशातील सुमारे ७३ व्यंगचित्रकार यांचा संमेलनात प्रत्यक्ष सहभाग आहे. याप्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार सुरेश क्षीरसागर, व्यंगचित्रकार , सामाजिक कार्यकर्ता गणेश जोशी, अमोल ठाकूर, कार्टूनिस्ट कंबाईनचे सचिव व्यंगचित्रकार महेंद्र भावसार, प्रसिद्धी प्रमुख राजेश दाभोळकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या माध्यमातून शाळा-शाळांमध्ये जाऊन व्यंगचित्रकार कार्यशाळा घेणार असलेल्या उपक्रमाचे पोस्टर यावेळी प्रकाशित करण्यात आले. अकोल्याचे गजानन घोंगडे यांनी संमेलनाचा लोगो तयार केला आहे.
...........................
*पत्रकार परिषद संपल्यावर उपस्थित चार-पाच बातमीदारांचे व्यंगचित्र रेखाटण्यात आले. व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक पाहताना बातमीदारांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. त्यावेळी वृत्त छायाचित्रकारांचे कॅमेरे हे दृश्य टिपण्यासाठी सरसावले होते.
----------------------------------------------------------------------
*४०० हुन अधिक व्यंगचित्र प्रदर्शनात पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची अप्रकाशित सामाजिक चित्र यानिमित्ताने कला रसिकांना याची देही याची डोळा पाहता येणार आहेत.
----------------------------------------------------------------------
*संमेलनात उपस्थित राहणार सर्व राजकीय नेते केवळ कलारसिक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, महापौर मीनाक्षी शिंदे आदी संमेलनात सहभागी होणार आहेत.
----------------------------------------------------------------------
*व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा होणार आहे. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चित्र पाहण्याची संधी यावेळी रसिकांना पाहता येणार आहेत.
----------------------------------------------------------------------
*बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. परंतु हे संमेलन कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही. कार्टूनिस्ट कंबाईनने यापूर्वी नांदेड, दादर, नागपूर येथे संमेलन आयोजित केले होते. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. आताही लोकसहभाग सकारात्मक असल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले. व्यंगचित्र कलेला उर्जितावस्था यावी, या हेतूने आयोजनात सहभाग घेतल्याचे राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.