लोकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर - शहापूर तालुक्यात कोरोना काळात झालेल्या दुर्लक्षामुळे ५४ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला होता, या ‘लोकमत’ने केलेल्या वृत्ताची दखल घेत शहापूर उपजिल्हा रुग्णालयात गुरुवार व शनिवार असे दोन दिवस कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजिले होते.
तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आज १२५ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अति तीव्र कुपोषित (सॅम) २७ बालके आढळून आली आहेत, तर तीव्र कुपोषित (मॅम) असलेली ९८ बालके आढळून आली आहेत. अति तीव्र कुपोषित २७ बालकांमधील दोन बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहापूर तालुक्यातील वाढत्या कुपोषणाला आळा बसावा, यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार कुपोषित बालकांचे आरोग्य तपासणी शिबिर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात राबविण्यात आले. आता दर महिन्यात दोनवेळा कुपोषित बालकांचे शिबिर राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात राबविण्यात आलेल्या शिबिरात तालुक्यातील वासिंद, अघई, डोळखांब, कसारा, टेंभा आदी नऊ प्राथमिक केंद्रांतर्गत १२५ कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बालरोग तज्ज्ञ डॉ. संजीव मिश्रा व डॉ. रोहन पाटील यांनी तपासणी केली. अति तीव्र कुपोषित बालकांमधील दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचे वजन वाढण्याच्या दृष्टीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
- डॉ. मनोहर बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक.