लोकमत न्यूज नेटवर्कखर्डी : गुरु वारी सायंकाळी वीज आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने खर्डीमध्ये अक्षरश: थैमान घातले. यात लग्न समारंभासाठी आलेल्या दोघांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. खर्डी विभागातील आंबिवली गावातील अदिवासीपाड्यावर लग्न सोहळा होता. यासाठी डिंभे, ता. शहापूर येथून पाहुणे म्हणून आलेले बुधाजी लडकू अगिवले (५०) यांच्यासह त्यांची पत्नी इंदिरा बुधाजी अगिवले (४०) तसेच खडीचापाडा येथील सरिता चौधरी (११) हे तिघे आंबिवली गावाजवळील जांभूळपाडा आणि ठाकूरपाडा येथील बंधाऱ्याजवळून जात असताना विजेचा लोळ या तिघांच्या अंगावर पडल्याने यात बुधाजी अगिवले आणि सरिता चौधरी हे जागीच ठार झाले. तर, इंदिरा अगिवले या गंभीर जखमी झाल्या. त्यांना खर्डी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी आणले असता त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रु ग्णालयात हलवण्यात आले. परिसरात वीज नसल्याने शवविच्छेदन खर्डी सरकारी रुग्णालयात होऊ न शकल्याने आ. पांडुरंग बरोरा यांनी या घटनेची दखल घेत शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था केली. या घटनेची माहिती मिळताच खर्डी महसूल विभागाचे मंडल अधिकारी पी.जे. कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दुसरीकडे पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. खर्डीतील प्रवीण अधिकारी यांची पोल्ट्री तसेच आमराईचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्रीची भिंत कोसळली आणि शेडचा भाग पक्ष्यांवर पडल्याने जवळपास २०० हून अधिक कोंबड्या ठार झाल्या. यात जवळपास २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्याच आमराईतील हापूस आंब्याची अनेक झाडे वाऱ्यामुळे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. वैतरणा रस्त्यावरील चंदन पार्क येथील इमारतीवरील पाण्याच्या सिंटेक्सच्या चार टाक्या जोरदार वाऱ्यामुळे खाली पडल्याने नुकसान झाले. तर दहिगाव, भोसपाडा, टेंभा या परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही भागात वीजपुरवठा खंडित झाला.शहापूर शहरासह ग्रामीणमध्ये पावसाची दमदार हजेरीआसनगाव : उन्हाने कासावीस झालेल्या शहापूरकरांना शुक्रवारी पावसाने सुखद गारवा देत दमदार हजेरी लावली. काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या लहानांसह मोठ्यांनीदेखील या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. ग्रामीण भागातील शेतकरीवर्गदेखील सुखावला आहे. पाऊस आल्याने अनेक दिवसांपासून भेडसावणारे पाणीटंचाईचे भयावह संकट आता दूर होणार असल्याने महिलावर्गातही आनंद आहे. मात्र, बेगमीचे म्हणून शेतकऱ्यांनी गुरांसाठी साठवलेली वैरण, सरपण, गोवऱ्या भिजल्याने त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. अनेकांच्या नवीन घरांची कामे अद्याप सुरू असल्याने ते मात्र चिंतातुर झाले आहेत. शहापूरसह नडगाव, शिरगाव, नेहरोली, दहिवली, बावघर, कलगाव, अल्याणी, गेगाव परिसरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. किन्हवलीत वादळाने घरांचे नुकसानलोकमत न्यूज नेटवर्ककिन्हवली : गुरुवारी झालेल्या वादळामुळे किन्हवली परिसरात अनेक घरांचे छप्पर उडाले. वृक्ष उन्मळून पडले असून विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.सोसाट्याच्या वादळामुळे किन्हवली परिसरातील मळेगाव येथील रवी पडवळ या पेपर स्टॉल विक्रेत्याच्या घरावरील पत्रे उडून खूप नुकसान झाले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय, नथू सदू जाधव, रामचंद्र पोसू शिर्के यांच्या घरावर वीज कोसळून उपकरणांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले. परिसरातील अनेक गावांना या वादळाचा तडाखा बसला. शेणवे-किन्हवली मार्गावरील विजेचे खांब कोसळल्याने किन्हवली परिसरात वीजपुरवठा खंडित झाला.
शहापुरात मान्सूनपूर्व पावसाचे दोन बळी
By admin | Published: June 03, 2017 6:21 AM