नितीन पंडित, भिवंडी: भिवंडी बस स्थानक नेहमीच समस्यांचे आगार बनले असतानाच मागील दोन दिवसांपासून शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी बस आगाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बस आगार प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने प्रवाशांना पाण्यात पाय बुडवून प्रवास करून बस पकडवी लागत आहे. या पाण्यातून वाट काढताना अनेक वेळा नागरिकांचे कपडे व चप्पल बूट खराब होत आहेत, त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे.
या बंद आगारात इतर वेळेस असलेली अस्वच्छता व सोयी सुविधांचा अभाव नेहमीच पाहायला मिळत असताना, पावसाळ्यात अशा प्रकारे बस आगारात पाण्याचे तळे साचल्याने भिवंडी बस आगाराकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल प्रवासी विचारत आहेत.