ठाणे : घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ पादचारी पुलाचे काम सुरू होणार असल्याने शनिवारी आणि रविवारी कापूरबावडी ते मानपाड्यादरम्यानची वाहतूक बंद केली जाणार आहे. या दोन दिवसांसाठी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.नागरिकांना महामार्ग ओलांडण्याचा त्रास होऊ नये, यासाठी तत्त्वज्ञान जंक्शनजवळ पादचारी पुलाचे काम सुरू आहे. १९ आणि २० आॅगस्टला याच कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक बंद ठेवणार असल्याचे शहर वाहतूक शाखेने सांगितले. मुंबई-गुजरात महामार्गावरून घोडबंदर रोडने गायमुखमार्गे ठाण्याकडे येणाºया अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. या वाहनांसाठी मनोर, चाविंद्रा (भिवंडी), वडपेनाका, रांजनोली, मानकोली ते खारेगाव टोलनाका हा पर्यायी मार्ग राहणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाने मुंबईकडून अहमदाबादकडे जाणाºया अवजड वाहनांना कापूरबावडी नाक्यापासून प्रवेश बंद राहील. या वाहनांसाठी कापूरबावडी सर्कल, बाळकुम, कशेळी, अंजूरफाटा, चिंचोटी ते वसईमार्गे पुढे जाता येईल. नवी मुंबई, पनवेल तसेच म्हापेमार्गे अहमदाबादकडे जाणाºया वाहनांना खारेगाव टोलनाक्यावर प्रवेशबंदी केली जाईल. त्यांना खारेगाव टोलनाक्यावरून मानकोली, रांजनोलीनाका, वडपे, चाविंद्रा, वाडा, मनोरमार्गे कल्याण फाटा तसेच कल्याण फाट्यावरून कल्याण-मानपाडामार्गे काटई टोलनाका, दुर्गाडी पूल, कोनगाव, रांजनोलीनाका ते वडपे नाक्यावरून वाडामार्गे पुढे जाता येईल. ठाण्याकडून वाघबीळ, कासारवडवली, गायमुखमार्गे जाणाºया एसटी, परिवहनच्या बसेस आणि इतर सर्व वाहनांना तत्त्वज्ञान सिग्नलपासून प्रवेशबंदी राहील. ही वाहने रवी स्टीलनाका, पोखरण रोड क्रमांक-२, गांधीनगर, लोक हॉस्पिटल, घाणेकर नाट्यगृह चौक, खेवरा सर्कल, हॅप्पी व्हॅली सर्कल, मानपाडामार्गे पुढे जातील. गायमुखकडून मानपाडा, कापूरबावडी मार्गे ठाणे-नाशिककडे जाणाºया वाहनांना बंदी राहील. त्यांना मानपाडा, हॅप्पी व्हॅली, घाणेकर नाट्यगृह चौक, गांधीनगर, पोखरण रोड क्र. २ मार्गे पुढे जाता येईल.
घोडबंदर रोडवरील वाहतूक शनिवारपासून दोन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 3:16 AM