पालघर : पालघर विधान सभेची १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असून उद्या सोमवारी शिवसेना व माकपा हे दोन पक्ष आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून काँग्रेस व बहूजन विकास आघाडी हे पक्ष बुधवारी शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिवसेनेने या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे सुपूत्र अमित घोडा यांना उमेदवारी दिली असून उद्या (सोमवारी) दुपारी १ वाजता उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, उपनेते अनंत तरे, उदय पाटील, उत्तम पिंपळे, विष्णू सवरा व आरपीआय नेते उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी सांगितले.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही चंद्रकांत वरठा यांना उमेदवारी दिली असून तेही उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.काँग्रेसचे उमेदवार म्हणून राजेंद्र गावितांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून राष्ट्रवादीने त्यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने बुधवारी मोठे शक्ती प्रदर्शन करून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे यांनी सांगितले. तर बहुजन विकास आघाडीच्यावतीने माजी राज्यमंत्री मनिषा निमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्याही आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बविआचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले.
अर्ज दाखल करण्यास दोन दिवस
By admin | Published: January 25, 2016 1:17 AM