ठाणे - नेहमीप्रमाणे ते कामावर आले; परंतु, त्यांच्या पुढ्यात मृत्यू वाढून ठेवला आहे याची पुसटशीही कल्पना त्यांना आली नसावी. काम सुरू असताना अचानक भला मोठा मातीचा ढिगारा अंगावर आला आणि चार कामगार त्याखाली गाडले गेले. ठाण्यातील नौपाडा बी केबिन येथील स्वाद हॉटेलजवळ इमारतीच्या बांधकामादरम्यान ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला; तर एकजण किरकोळ जखमी आणि एक सुखरूप आहे.
घटनेची माहिती मिळताच उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहायक आयुक्त (नौपाडा प्रभाग समिती) यांच्यासह मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. एका कामगाराला सुखरूप बाहेर काढले. जखमी कामगारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. हबीब बाबू शेख (वय ४२, रा. शंकर मंदिर, मुंब्रा) आणि रणजित अशी मृत कामगारांची नावे असून निर्मल रामलाल राब (४९, रा. शिवाजीनगर, मुंब्रा) यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे.
पाया खोदण्याचे काम सुरू असतानाच दुर्घटनाबी कॅबिन येथील सत्य नीलम या कन्स्ट्रक्शन साईटवर पाया खोदण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास मातीचा ढिगारा घसरला आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडला.