तब्बल ५ वर्षा पासून खासदार राजन विचारे करत होते पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावर मच्छिमारांच्या बोटी नांगरण्यासाठी भुतोडी व पातान बंदर येथे जलभंजकचे काम सुरू केले जाणार आहे. या ४४ कोटी खर्च करून होणाऱ्या दोन्ही कामांचे भूमिपूजन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. गेली पाच वर्षे सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर या दोन्ही कामांना सुरुवात होत असल्याचे ते म्हणाले .
उत्तनच्या भुतोडी व पातान बंदर हे कोळीवाडे समुद्रकिनाऱ्या लगत आहेत. त्यामुळे मासेमारी करून आलेल्या बोटी या समुद्रातच खोलवर नांगरून लहान बोटींद्वारे मासळी आणणे तसेच मासेमारीसाठी जाताना लहान बोटीद्वारेच सामानाची वाहतूक करावी लागते. पावसाळ्यातसुद्धा किनाऱ्यावर बोटी शाकारून ठेवणे धोक्याचे असल्याने येथील मच्छिमारांना बोटी शाकारून ठेवण्यासाठी चौक - भाईंदरपासून गोराई - मार्वेपर्यंत जावे लागते. पावसाळ्यात तेथेच त्या ठेवून त्यांची दुरुस्ती, रंगरंगोटीसाठीसुद्धा तेथेच खेपा माराव्या लागतात.
उत्तनजवळील समुद्र खडकाळ असल्याने बोटींना अपघात होऊन नुकसान होण्याचे प्रकार घडत असतात. विचारे यांनी भुतोडी व पातान बंदर येथे जेटीच्या कामासाठी ऑक्टोबर २०१५ पासून शासनासह संबंधित खात्यांकडे पाठपुरावा चालवला होता. अखेर या दोन्ही बंदरांलगतच्या समुद्रात जलभंजक बांधण्याच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. सन २०१६ - १७ च्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या कामांसाठी ४४ कोटींची तरतूद केलेली आहे.
भुतोडी बंदर येथे २६० मीटर, तर पातान बंदर येथे २३० मीटरचा समुद्रात जलभंजक बांधला जाणार आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक मोठे बोट यार्ड, पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येकी एक पंपगृह, सौर ऊर्जेवर चालणारे प्रत्येकी ७० असे मिळून १४० दिवे लावण्याची कामे केली जाणार आहेत.
यावेळी आमदार गीता जैन, मच्छिमार नेते बर्नड डिमेलो, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, स्थानिक तिन्ही नगरसेवक एलायस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला गंडोली, मच्छिमार जमातीचे पाटील कलमेत गौऱ्या, डिक्सन डीमेकर आदी उपस्थित होते.