मुंब्राः गुंगी आणणाऱ्या कफ सिरपच्या १७ हजार ४३३ रुपये किमतीच्या १०० मिलीच्या ११७ बाटल्या विनापरवाना विक्री करण्याच्या हेतूने जवळ बाळगलेल्या अरबाज शेख (वय २३ रा. मुल्ला चाळ, अचानकनगर, मुंब्रा) याला येथील बायपास रस्त्यावरून तर आठ हजार ५०० रुपये किमतीचा एक हजार २१० ग्रॅम गांजा जवळ बाळगलेल्या हुजेफा पुरणवाला (वय ३७ रा. फेमस बिल्डिंग बी विंग, रूम नंबर ६१, मुंब्रा) याला रेल्वेस्थानकासमोरील उड्डाणपुलाखालून मुंब्रा पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने दोघांना ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अनुक्रमे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेडगे आणि संतोष उगलमुगले करीत आहेत. अंमली पदार्थ विकणाऱ्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत दोघांना अटक केली असून, ही मोहीम पुढे अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.