डोंबिवली - दिड वर्षापूर्वी एमआयडीसी भागातील पोब्रेस कंपनीतील महाकाय स्फोटाच्या जखमा अद्याप भरल्या गेलेल्या नसताना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास येथील फेज टू मधील अँल्यूफिन या अल्युमिनियम कोटींगच्या कंपनीत काँम्प्रेसरच्या झालेल्या स्फोटात दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली. यातील राजू जावळे या कामगाराचा पाय पूर्णपणे निकामी झाला असून त्याला उपचारार्थ नजीकच्या एम्स रुग्णालयात दाखल केले आहे.
त्याची प्रक्रुती चिंताजनक आहे. या स्फोटाची तीव्रता मोठी होती. कंपनीपासून ६०फुट अंतरावरील कल्याण शीळ मार्गावर काँम्प्रेसरचे अवषेश उडाले आहेत. यात मोटारसायकल वरील दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळतेय. स्फोट होताच या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक मानपाडा पोलीस आणी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
काँम्प्रेसरमध्ये प्रेशर वाढल्याने हा स्फोट झाल्याचे बोलले जाते. अजून आम्ही किती स्फोट पहायचे आणि बळी जायचे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक शशिकांत कोकाटे यांनी दिली. या घटनेचा तपास सुरु चौकशीअंती कारवाई करु असे आश्वासन मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली.