लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - स्वतः काम करत असलेल्या कंपनीच्या मोबाईल टॉवर मधील साहित्याचीच चोरी करणाऱ्या वोडाफोन मधील दोघा तांत्रिक कमर्चाऱ्यांना मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे . ह्या आरोपींनी कांदिवलीच्या समता नगर व दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अश्याच चोऱ्या केल्याचे उघडकीला आले आहे .
भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक जवळ स्काय वॉक वर असलेल्या वोडाफोन च्या मोबाईल टॉवर वरील साहित्य चोरीला गेल्याने कंपनीच्या वतीने सुनील साळवी यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता . सदर गुन्ह्याचा तपास हा मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल राख, सहायक निरीक्षक सरक सह मनोहर तावरे, प्रविण पवार, नांगरे, हनुमंत सुर्यवंशी यांच्या पथकाने सुरु केले होते .
दरम्यान तावरे यांना त्यांच्या खबरी मार्फत माहिती मिळाली कि , दोन इसम मोबाईल टॉवरचे साहित्य विक्री करण्याकरीता मीरारोड येथे येणार आहेत. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून मोबाईल टॉवरचे साहित्य विक्री करण्याकरीता आलेले अक्षय दत्ताराम शिंदे (२६) रा . देवसृष्टी, निळे मोरेगांव, नालासोपारा व फकीर त्रिनाथ जेना (३६) रा . महादेव नगर, नवघर रोड, भाईंदर पूर्व यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
तपासात ते दोघे वोडाफोन कंपनीत टेक्नीशिअन्स म्हणून काम करत असुन गेल्या ५ ते ६ महिन्यापासुन मोबाईल टॉवर वरील थोडे थोडे साहित्य चोरी करून जुगेश बिंदु गुप्ता (३३) रा. इंदिरा नगर, झोपडपटटी, भाईंदर पूर्व ह्या भंगार विक्रेत्यास विकत होते . ह्या दोघा आरोपींची मुंबईतील समतानगर पोलीस ठाणे हद्दीत असे २ गुन्हे तर दहीसर पोलीस ठाणे हद्दीत १ गुन्हा केल्याचे चौकशीत आढळून आले . तर गुप्ता याच्या दुकानातून १ लाख १३ हजारांचे मोबाईल टॉवरचे पार्ट हस्तगत करण्यात आले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"