ठाणे : अल्प मोबदल्यामध्ये अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून त्यांची पिळवणूक करणाºया इंद्रजित प्रजापती आणि तन्वीर अन्सारी या दोघांना कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन किशोरवयीन मुलांची सुटका करण्यात आली असून, या दोघांनाही आता उल्हासनगर येथील वरिष्ठ बालवसतिगृहात ठेवण्यात आले आहे.पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने कळवा पोलिसांनी बालकामगारांविरुद्ध २९ नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेसाठी सलाम बालक, ठाणे चाइल्ड लाइन संस्थेच्या समन्वयक सूचना पेडणेकर यांचीही मदत घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मंगेश महाजन, डी.के. साळुंखे, सुरेश जाधव आणि संतोष वसावे आदींच्या पथकाने कळव्यातील भास्करनगर येथील राधाकृष्ण चाळीतील कांता चहा या उपाहारगृहामध्ये २९ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी एक किशोरवयीन मुलगा भांडी घासताना तिथे आढळून आला. महिना चार हजार रुपये पगाराने इंद्रजित प्रजापती यांनी त्याला कामावर ठेवल्याची माहिती समोर आली.त्यानंतर, जमादार महाजन यांच्या पथकाने भास्करनगर परिसरातील शंकर मंदिरातील चाळीमध्ये एका वेल्डिंगच्या दुकानामध्ये वेल्डिंगचे काम करणाºया अन्य एका अल्पवयीन मुलाची सुटका केली. त्याला महिना दोन हजार रुपये पगारावर याच दुकानाचे मालक तन्वीर अन्सारी यांनी कामावर ठेवले होते. चौकशीनंतर अन्सारी यांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात बालन्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मालकांची रविवारी जामिनावर सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.कोवळ्याच्या पाठीवर कामाचे ओझेबालदिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. परंतु, ते केवळ प्रातिनिधिक चित्र असून आजही कोवळ्यांच्या पाठीवर कामाचे ओझे लादण्यात येत आहे. लहान वयात खेळणे, बागडणे तसेच शाळेत जाऊन अभ्यास करण्याऐवजी कोवळी मुले विविध आस्थापनात राबत असल्याचे ठाणे जिल्ह्यातील चित्र आहे
अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणाऱ्या दोन मालकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 12:46 AM