पालघर:- या स्थानकात दोन मेल एक्सप्रेस आपल्या कार्यकाळात सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घालणार असल्याचे खासदार राजेंद्र गावीत यांनी डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाला सांगितले.संस्थेच्या शिष्टमंडळाने त्यांची सोमवारी शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन त्यांच्या पुढे रेल्वेविषयक समस्यांचा पाढा वाचला. त्यात मुख्यत्वे नवीन मंजूर झालेल्या लोकल फेऱ्या त्वरित सुरु करणे, पालघर येथे मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणे आणि वैतरणा येथे ५९४४१ आणि ५९४४२ या अहमदाबाद पॅसेंजरला थांबा देणे यासह अनेक समस्यांचा समावेश होता.खासदारांनी संस्थेच्या मागण्या ऐकून घेतल्या व नविन लोकल नोव्हेंबर मध्ये सुरु होणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पालघर स्थानकात दोन मेल एक्सप्रेस गाड्या आपल्या कार्यकाळात सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी प्रसंगी पंतप्रधान मोदी यांना साकडं घालण्याची तयारी असल्याचे गावीत त्यांनी सांगितले. १० नोव्हेंबर रोजी वैतरणा ते घोलवड मधील सर्व स्थानकांवर पश्चिम रेल्वेच्या डीआरएम यांची भेट आयोजित करण्यात आली असून त्याप्रसंगी उपस्थित राहून संस्थेच्या सदस्यांनी अभ्यासपूर्ण मागण्या त्यांच्या समोर मांडाव्यात अशी सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केली. याप्रसंगी संस्थेतर्फे सतिश गावड, नागदेव पवार, सखाराम पाटील, हितेश सावे तसेच प्रथमेश प्रभूतेंडोलकर उपस्थित होते. खासदारांच्या आश्वासनानुसार आता संबंधित बाबी कधी घडून येतात याकडे पालघरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘पालघर स्थानकात दोन एक्सप्रेस थांबतील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:44 PM