डोंबिवली : पूर्वेला रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या चार मजली म्हात्रे इमारतीमधील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील आतील भागातील सज्जे गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केलेली नव्हती. मात्र, तिचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची नोटीस बजावली होती. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील अन्य धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
केडीएमसीच्या ‘ग’ प्रभागातील राथ रोडवरील विजय म्हात्रे यांच्या मालकीच्या असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर १२ दुकाने आहेत. पहिल्या मजल्यावर साईपूजा हॉटेल तर, दुसºया मजल्यावर बाळकृष्ण मंगल कार्यालय आहे. इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला वापराविना रिकामा होता. तेथे हॉटेलचे काही कर्मचारी राहत होते, अशी माहिती मिळत आहे. सज्जे कोसळल्यानंतर कोणालाही इजा झालेली नाही. जोरदार वाºयामुळे गच्चीवर लावलेला पत्रा पूर्णपणे वाकला आणि त्याचे बांबू आतल्या आत खाली पडल्याने वरील मजल्यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे. या इमारतीचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने प्रारंभी इमारतीचा धोकादायक भाग तोडायचा कसा, असा पेच अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला होता. परंतु, इमारत अतिधोकादायक अवस्थेत असल्याने कारवाई करण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला. त्यानुसार सायंकाळी इमारतीचे तोडकाम हाती घेण्यात आले.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इमारत पूर्णपणे रिकामी केली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे गटनेते व स्थानिक नगरसेवक मंदार हळबे, नगरसेवक व शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनीही घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. महत्त्वाचे म्हणजे ही इमारत रेल्वेस्थानकाबाहेर असल्याने तेथे नेहमी वर्दळ असते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, येथील रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.डोंबिवली स्थानकातील मधल्या पादचारी पुलाची एक बाजू आणि सरकता जिना म्हात्रे इमारतीनजीक उतरतो. खबरदारीचा उपाय म्हणून या पुलाची ही बाजू तातडीने बंद करण्याच्या सूचना चव्हाण यांनी रेल्वेच्या अधिकाºयांना दिल्या. तसेच महापालिका अधिकाºयांनाही योग्य कार्यवाहीचे आदेश दिले.३७ इमारती अतिधोकादायककेडीएमसीच्या ‘ग’ प्रभागात ३७ इमारती अतिधोकादायक तर, नऊ इमारती धोकादायक आहेत. या घटनेमुळे प्रभागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित मालकांना तसेच सोसायटींना नोटिसा बजावल्याची माहिती ‘ग’ प्रभागाचे अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी दिली.