ठाणे : वागळे इस्टेट येथील किसन नगर नंबर २ येथील हनुमंत शिंदे यांच्या राहत्या घरात दोन ते सव्वादोन फुटांची घोरपड शुक्रवारी आढळली असून तिला प्राणी मित्रांनी पकडून ठाणे वनविभागाच्या स्वाधीन केले आहे.
ती घोरपड शिकारीच्या शोधात नाही तर सातत्याने होणाऱ्या पावसामुळे डोंगरातील पाण्याच्या प्रवाहात वाहून आली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
किसन नगर येथील जगदीश निवासमध्ये राहणारे शिंदे यांच्या घरात एका कोपऱ्यात घोरपड असल्याची बाब लक्षात येताच त्यांनी ती माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यांनी प्राणीमित्र संघटनेला याची माहिती देताच प्राणीमित्र उमेश इंदिसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. ती साधारण एक वर्षाची असून तिचे वजन हे एक किलोच्या दरम्यान असावे. तसेच तिला कोणतीही जखम झालेली नसून ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आली असावी. त्यानंतर ती सुरक्षित जागेच्या शोध घरात शिरली असावी, अशी माहिती प्राणीमित्र इंदिसे यांनी दिली. अशाप्रकारे घोरपड रेस्क्यू करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती त्यांनी दिली.