उल्हासनगर : शहरासह परिसरातून दुचाकी चोरणाºया दोन टोळींना गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. त्यांच्याकडून १४ दुचाकीसह तीन मोबाइल जप्त केले असून, न्यायालयाने त्यांना १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उल्हासनगरसह अंबरनाथ, कल्याण आदी परिसरातून दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने शॅडो पथकाची स्थापना करून सीसीटीव्ही कॅमेरे व महितीद्बारे अंबरनाथ येथील अन्नुराग विजय आढारी याला दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली. त्याला बोलते केले असता, मित्र कार्तिक गायकवाड याच्याबरोबरीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
तसेच म्हारळगाव येथील सुनील भगवान काळे उर्फ सुनील यलप्पा गुंडाळे व विजय वेंकटी जाधव यांना अटक केल्यावर त्यांनी दुचाकीबरोबरच मोबाइल चोरल्याची कबुली दिली. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने चौघांना अटक केली असून, त्यांनी १३ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण १४ दुचाकी जप्त केल्या असून त्यांनी तीन मोबाइल चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने चौघांना न्यायालयापुढे हजर केले असता १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जप्त केलेल्या दुचाकीची किंमत पाच लाख ८० हजार आहे.