ठाणे: सोमवारी सकाळी ठाण्यातील एका शाळेतील नववीतील दोन विद्यार्थीनी शाळेत जाण्याऐवजी मुलूंडच्या उद्यानामध्ये गेल्यामुळे शिक्षकांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा सुटण्याच्या वेळेत फेरफटका मारुन या मुली पुन्हा शाळेतच परतल्यामुळे पालकांसह श्रीनगर पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. ठाण्यातील वागळे इस्टेट शिवाजीनगर भागातील संकल्प स्कूलमधील इयत्ता नववीतील दोन १४ वर्षीय विद्यार्थीनी शाळेबाहेरुनच बेपत्ता झाल्याची माहिती याच शाळेच्या एका विद्यार्थीनीने शिक्षकांना दिली.
घटनेची माहिती मिळताच या मुलींची त्यांच्या घरीही सोमवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून शोधाशोध सुरु झाली. त्या घरी देखील नसल्यामुळे पालकांसह शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्याकडून याबाबत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. तोपर्यंत एका मुलीकडून माहिती मिळाली की, रविवारीच तीन मुलींनी मुलूंडच्या उद्यानात फिरायला जाण्याची योजना बनविली होती. तिसऱ्या मुलीला तिची आई शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडण्यासाठी गेल्यामुळे ती या दोन मुलींसोबत जाऊ शकली नव्हती.
पोलिसांसह शिक्षकांची उडाली तारांबळ सोशल मिडियावरुन या दोन मुली बेपत्ता झाल्याची वार्ता शहरभर पसरली. तोपर्यंत ठरलेल्या योजनेनुसार शाळा सुटण्याच्या वेळेत कथित बेपत्ता झालेल्या मुली पुन्हा शाळेकडे परतल्या. तोपर्यंत श्रीनगर पोलिसांकडून या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हाही दाखल झाला नव्हता. परंतु, आपल्या मुली सुखरुप घरी परतल्याचे पाहून पालक आणि शिक्षकांनीही सुटकेचा श्वास घेतला.
पालकांनी आपल्या मुलांशी मैत्री करीत त्यांच्याशी संवाद वाढविला पाहिजे. अनेकवेळा आई आणि वडिलही नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मुले एकाकी पडतात. त्यांनाही बाहेर फिरावेसे वाटते. त्यामुळे कधीतरी त्यांनाही फिरायला न्यावे. परंतू, मुले आणि मुलींनीही पालक आणि शिक्षकांच्या परवानगी विना घर आणि शाळा सोडणेही चुकीचे आहे. त्यामुळे एखादी दुर्घटनाही घडण्याची शक्यता असते. असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी म्हटले.