ठाणे :
सिडको येथील सिडको बस स्टॉप व साई बाबा मंदिराजवळील रोड शेजारी उभ्या असलेल्या फालुदा विकणाऱ्या हात गाडीवर झाड कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पादचारी विलास सुर्वे (५१) यांच्यासह फालुदा विक्रेता लेहरू गुजर (१८) आणि सुखी मच्छी विक्रेत्या हेमलता ठाणेकर (५५) असे तिघे जखमी झाले आहेत. तर या घटनेत झाड पडल्यामुळे फालुदा गाडीचे मोठे नुकसान झाले असून पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.सिडको येथे हात गाडीवर झाड कोसळून तिघे जण जखमी झाल्याची माहिती मिळताच घटना,घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभाग, ठाणे नगर पोलीस , आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. चेंदनी कोळीवाडा येथील रहिवासी असलेले जखमी गुजर यांच्या हात गाडीवर झाड पडले. या घटनेत त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. तसेच त्यांच्या गाडी शेजारी बसलेल्या सुखी मच्छी विक्रेत्या ठाणेकर यांच्या कमरेला मुका मार लागला आहे. याचदरम्यान रस्त्यावरून जाणारे कोलबाड येथील पादाचारी सुर्वे यांच्याही कमरेला व पायाला मुका मार लागला आहे. तर लेहरू यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.