ठाणे : दोनशे ग्रॅम पेढे घेताना काढलेले पाकीट चोरीला गेल्याची घटना कळव्यात घडली आहे. या घटनेत १२४ रुपयांची मिठाई दोन लाख सात हजार ५०० रुपयांना पडली असून याप्रकरणी वैशाली भोईर (६०, रा. कळवा) यांच्या तक्रारीनुसार कळवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
भोईर १९ डिसेंबरला सायंकाळी महागिरी कोळीवाडा येथील कृष्ण मंदिरात आरती करून घरी निघाल्या होत्या. दरम्यान, कळव्यातील एका मिठाईवाल्याकडे २०० ग्रॅम पेढे घेतले. त्याचे पैसे देण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून कापडी पिशवीतून पाकीट काढत १२४ रुपये दिले. त्यानंतर त्या कळवानाका येथून पश्चिमेस रस्ता ओलांडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पायी गेल्या व रिक्षाची वाट पाहत होत्या. पण तेथेही रिक्षा मिळत नसल्याने त्या पुन्हा कळवानाक्यावर येऊन रिक्षा पकडून मुलाच्या घरी गेल्या. दरम्यान, पाकीट पाहिले असता ते मिळाले नाही. त्या पाकिटात सव्वा लाखांचे मंगळसूत्र, ७५ हजारांची चेन, साडेसात हजारांचे कानातले असा ऐवज असल्याचे म्हटले आहे.