भाईंदर : देशातील ‘मी टू’चे प्रकरण शमत असताना मीरा-भाईंदर महापालिकेत मात्र हे वादळ जोर धरत आहे. पालिकेतील आरोग्य विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध दोन महिलांनी विशाखा समितीकडे तक्रारी केल्या असून, त्यापैकी एक महिला आरोग्य विभागाचीच कर्मचारी असून, दुसरी पालिकेच्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तक्रारींवर १७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.शासनाच्या निर्देशानुसार कामकाजाच्या ठिकाणी लैंगिक छळास सामोरे जाणाºया महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करणे अभिप्रेत आहे. त्याअनुषंगाने मीरा भार्इंदर पालिकेतही ही समिती कार्यरत आहे. या समितीसमोर ‘मी टू’ची दोन प्रकरणे आली आहेत. आरोग्य विभागाशी निगडीत दोन व्यक्तींविरोधात या तक्रारी आहेत. या तक्रारी कुणाच्या विरुद्ध आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या तक्रारी आल्यानंतर समितीने ही बाब गोपनीय ठेवली आहे. त्यामुळे या तक्रारी कुणाच्या विरोधात आहेत, याची पालिकेत चर्चा सुरू आहे. या समितीचे अध्यक्ष अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर हे असून, आरोग्य विभागाचेच उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे हे उपाध्यक्ष आहेत. एकूण १० जणांच्या समितीतील उर्वरीत ८ सदस्यांमध्ये पालिकेच्या विविध विभागातील महिला अधिकाºयांसह कर्मचारी, डॉक्टर, मुख्याध्यापिका आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी महिलांचा समावेश आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेत ‘मी टू’च्या दोन तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:01 AM