भिवंडी - शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीत खाडीपार येथे एक मजली जर्जर चाळीचा भाग कोसळुन झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी घडली. तालुक्यातील खोणी खाडीपार येथे एक महिन्या पुर्वी धोकादायक इमारत कोसळुन झालेल्या दुर्घटनेत एक महिलेचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज शनिवारी सायंकाळी 6.45 वा .च्या सुमारास एक मजली जुन्या जर्जर चाळीचा स्लॅब कोसळला.या दुर्घटनेत चाळीचा अर्धा भाग कोसळला. घटनास्थळी स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करीत दोघा पिता पुत्रांना ढिगा-या खालून काढुन स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे .हुसेन मंसुरी ( 55 ) व आजम मंसुरी ( 24 ) असे जखमी पितापुत्रांची नावे असुन त्यांच्या डोक्यात व इतर ठिकाणी मार लागल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे.तसेच त्यांच्या कुटुंबातील आलम मंसुरी ( 26 ) व हव्वा खातुन मंसुरी ( 45 ) या दोघांना किरकोळ मार लागला आहे. सुदैवाने तळमजल्यावर दुकान व सर्व खोल्या रिकाम्या असल्याने जिवितहानी टळली आहे . खाडीपार परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी व जुन्या इमारती असुन त्यापैकी वहाब मुकादम यांची चाळ ही जुनी जर्जर चाळ झाली होती.विशेष म्हणजे या घटनेची माहिती ग्रामपंचायत प्रशासनास कळविल्यानंतर सुध्दा घटनास्थळी अग्निशामक यंत्रणा अथवा तहसीलदार कार्यालयातील आपत्कालीन व्यवस्था यांना कळविले नाही.त्यामुळे घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत कोणीही हजर झाले नाही .
भिवंडीत खाडीपार येथे कोसळला एक मजली चाळीचा भाग, दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 10:43 PM