ठाणे : कमी व्याजदराने पैसे देण्याचे आमिष दाखवून सुमारे ४0 लाख रुपयांचे दागिने हडपणार्या दोन आरोपींविरूद्ध कोपरी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी सराफा व्यावसायिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपी जगदीश प्रजापती याचे कोपरी येथील गांधीनगरात चिराग ज्वेलर्स नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. आपली सरकारमान्य सोन्याची पेढी असून दागिने गहाण ठेऊन कमी व्याजदराने पैसे देत असल्याचे तो ग्राहकांना सांगायचा. ४ वर्षांपासून लोकांनी विश्वास ठेऊन त्याच्याकडे दागिने गहाण ठेवले. या दागिन्यांवर प्रजापतीने त्यांना सुरूवातीला ३ टक्के व्याजाने पैसे दिले. मात्र अडचण संपल्यानंतर संपूर्ण रक्कम घेऊन दागिने सोडविण्यासाठी ग्राहक दुकानावर गेले असता त्यांना टाळाटाळ केली जायची. आपण घाटकोपर येथील कृमघ्य उर्फ टिपू बोरा याच्या मधुरम ज्वेलर्सकडे दागिने ठेवले असल्याचे सांगून त्याने ग्राहकांची बोळवण करण्यास सुरूवात केली. प्रजापतीचे खरे रूप समजल्यानंतर ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या. आतापर्यंत कोपरी पोलिसांकडे २४ ग्राहकांनी फसवणुकीच्या तक्रारी दिल्या. या ग्राहकांना प्रजापतीने ४0 लाख ४१ हजार ४२५ रुपयांनी लुबाडले. काही ग्राहकांनी दागिने बनविण्यासाठी प्रजापतीकडे रोख रकमाही दिल्या होत्या. प्रजापतीने त्यादेखील हपडल्याची माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दिली.तृतियपंथियांनाही लुबाडलेचौका-चौकात भिक मागून पोट भरणार्या काही तृतियपंथियांनी पैसा-पैसा जमवून जगदीश प्रजापतीकडे दागिने बनविण्यासाठी रक्कम जमा केली होती. आरोपीने त्यांनाही लुबाडले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दिली. जगदीश प्रजापतीचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
४0 लाखाचे दागिने हडपणार्या दोन सराफा व्यावसायिकांवर ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 7:36 PM
ग्राहकांचे ४0 लाख रुपयांचे दागिने हडपणार्या दोन सराफा व्यावसायिकांविरूद्ध ठाण्यातील कोपरी पोलिसांनी दाखल केले. त्यांच्याविरूद्ध २४ ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत.
ठळक मुद्देकमी व्याजदराचे आमिष२४ ग्राहकांच्या तक्रारीएक सराफा व्यावसायिक घाटकोपरचा