- जितेंद्र कालेकर ठाणे : एका व्यावसायिकाकडून २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी राजस्थानमधील दोघांचे अपहरण करणाऱ्या लेनीन कुट्टीवट्टे, रोहित शेलार, ओमप्रकाश यादव, अभिषेक झा, सागर साळुंखे आणि मुंबईतील पोलीस तुकाराम सुदगे या सहा जणांना ठाणे पोलिसांनी शनिवारी अटक केली.या आरोपींच्या ताब्यातून देवानंद वरंदानी (२८) आणि रोनक सैनी (रा. दोघेही उदयपूर, राजस्थान) यांची सुखरूप सुटका झाली आहे. उदयपूर (राजस्थान) येथे देवानंद यांची मालमत्ता तारण ठेवून कर्ज करून देणारी कंपनी आहे. यातूनच देवानंद यांच्याशी अपहरणकर्त्यांची ओळख झाली होती. पूर्वी देवानंदच्या कंपनीत असलेल्या लेनीन याने अपहरण आणि खंडणीची योजना आखली. त्याने कल्याणमधील ओमप्रकाश यादवमार्फत देवानंदला फोन केला. आपण बिल्डर असून १० कोटींच्या कर्जाची गरज असल्याचे यादवने देवानंदला सांगितले. त्यामुळे ८ सप्टेंबरला देवानंद कल्याणला आला. तेथेच आरोपींनी तलवारीच्या धाकाने एक कोटीच्या खंडणीची मागणी केली. अखेर, २५ लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर ही रक्कम खंडणीखोरांना देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकानेसापळा रचून आरोपींना अटक केली.
राजस्थानच्या दोन अपहृत तरुणांची ठाण्यात सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 5:39 AM