ठाणे: ठाण्यात रोबोडी परिसरात खत्री अपार्टमेंट ही 25 वर्ष जुनी इमारत रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास कोसळून दोघांचा मृत्यू झाला. इमारतीमधील ७५ रहिवाशांच अन्यत्र स्थलांतर करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका सूत्रांनी दिली.
या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील अश्फाक वागनी यांचा पूर्ण स्लॅब हा तळ मजल्यावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन टीम, अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले. तिघेजण स्लॅबखाली दबले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित रेस्क्यू ऑपरेशन करून या तिघांना बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. यापैकी एकाला संजीवनी हॉस्पिटल तर दोघांना लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
इमारतीमधील ७५ कुटुंबांना बाहेर काढण्यात आल आहे. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी तसेच अग्निशमन दल,एनडीआरएफ पथक यांच्याकडून मदतकार्य करण्यात येत आहे. बिल्डिंग मधील रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्याची व पुढील कारवाई महापालिका अधिकारी समन्वय साधून करीत आहोत, महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुले यांनी सांगितले. रमिज शेख ,अरमान तांबोळी यांचा मृत्यू झाला असून गॉस तांबोळी हे जखमी झाल्याचे समजते.