डोंबिवली : इंडिगो एअरलाइन्समध्ये नियुक्ती झाली असून, त्यासाठी लागणाऱ्या तपासणीच्या नावाने बेरोजगार तरुणांना बँक खात्यात आॅनलाइनद्वारे पैसे भरायला सांगत त्यांची एक लाख ९७ हजार ३५२ रुपयांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.
पूर्वेतील टिळकनगर परिसरात राहणारा हर्षल सारोलिया (२४) याला जॉबसर्च या पोर्टलकडून एक फोन आला. फोन करणाºयाने तुमची इंडिगो एअरलाइन्समध्ये मनुष्यबळ विकास विभागासाठी निवड झाल्याचे सांगितले. तसेच त्यासाठी लागणाºया विविध प्रकारच्या तपासणीसाठी एक हजार ७०० रुपये आॅनलाइनद्वारे भरावे लागतील, असेही त्याने हर्षल याला सांगितले. भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हर्षल याने संबंधित बँक खात्यावर वेळोवेळी २२ हजार ७०० रुपये भरले. त्याचप्रमाणे अन्य नऊ तरुणांनीदेखील एकूण एक लाख ७४ हजार रुपये आॅनलाइनद्वारे भरले. मात्र, पैसे भरूनही कोणत्याच प्रकारची तपासणी करण्यात न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे हर्षल याच्या निदर्शनास आले. याप्रकरणी हर्षल याने मंगळवारी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.