ठाणे : ठाण्यातील जेल अधिकाऱ्याच्या पत्नीची दागिने असलेली बॅग रिक्षात प्रवास करीत असताना गहाळ झाली. या संदर्भात ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांत सदर रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याच्या ताब्यातून ही बॅग हस्तगत करून ती जेल अधिकारी आणि त्यांच्या पत्नीस ऐवजासह सुपूर्द केली.
ठाण्यातील जेल पोलीस लाइन येथे राहणारे अतुल यमाजी तूवर हे जेल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तूवर व त्यांची पत्नी १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास माजिवडा ब्रिज येथून रिक्षा पकडून जेल पोलीस लाइन येथे उतरले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या ताब्यातील बॅग रिक्षात विसरून गहाळ झाली. सदर तीमध्ये तूवर यांच्या पत्नीचे चार तोळे वजनाचे दोन लाख १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व कपडे असा ऐवज होता. याप्रकरणी त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक अधिकारी उपनिरीक्षक बाराते व त्यांच्या पथकाने तपासचक्र फिरवले. रिक्षाचे स्वरूप जुन्या प्रकारचे दिसून येत असल्याने व तशा रिक्षा सीडब्ल्यू सिरीजच्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी पहाटे सापळा रचून सीडब्ल्यू सिरीज रिक्षाचालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता रिक्षा क्रमांक एमएच ०४ सीडब्ल्यू ५८३० वरील चालक मनोज पटेल (३६) याने त्याच्याच रिक्षात बॅग राहून गेल्याची कबुली दिली.