ठाणे : हिरानंदानी इस्टेट येथील ‘वॉक मॉल’ परिसरातील दोन वेगवेगळ्या वाहनांमधील सुमारे साडेचार लाखांचा ऐवज अन्य एका कारमधून आलेल्या भामट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. संबंधित कार आणि तो भामटाही या भागातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.‘वॉक मॉल’मधील एका दुकानाचे मालक पुष्कर सिंग हे २३ डिसेंबरला सकाळी १० च्या सुमारास नागपूर येथून आले होते. ते नाश्ता करण्यासाठी याच मॉलसमोरील उपाहारगृहात गेले. अर्ध्या तासाने ते परतले. तोपर्यंत त्यांच्या कारमधील दागिने आणि रोकड असा चार लाख दोन हजार ५०० चा ऐवज असलेली बॅग चोरीस गेली होती. त्यांच्या कारच्या डावीकडील मागील बाजूची काच फोडून चोरट्यांनी ती लंपास केली. त्याच वेळी अन्य एका कारमधूनही त्याने दागिने आणि रोकड असा ४५ हजारांचा ऐवज चोरला. हा सर्व प्रकार जवळच्याच एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून लाल कारमधून उतरलेला हा चोरटा पद्धतशीरपणे कारमधील ऐवज चोरत असल्याचे त्यात दिसत आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे तपास करण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले....................नागरिकांना आवाहनचालक किंवा कारचालकांनी आपला किमती ऐवज किंवा रोकड कारच्या बाहेर पडताना तशीच कारमध्ये ठेवू नये. हिरानंदानी परिसरात सुरक्षा व्यवस्था चांगली असूनही हा प्रकार घडला. त्यामुळे कारचालकांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी केले.