ठाणे : अक्कलकुवा (जिल्हा नंदुुरबार) येथील व्यापारी रिजवान मेमन आणि त्याचा मित्र एजाज नुरू यांना आधी सेक्सच्या जाळ्यात अडकवून खंडणीसाठी ओलीस ठेवल्याचा आरोप असलेल्या महिलेसह दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. पोलिसांनी अटक करू नये, म्हणून ते गेल्या एक आठवड्यापासून ठाणे शहर वर्तकनगर पोलिसांना हुलकावणी देत आहेत.रिजवानला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून दोन लाख १० हजारांची खंडणी दीपक वैरागड या पोलीस कॉन्स्टेबलसह त्याचा साथीदार सोहेल पंजाबी, सोहेलची मैत्रीण आणि एक रिक्षाचालक अशा चौघांनी मिळून हा खंडणीचा कट आखल्याचा आरोप आहे. यामध्ये येऊरच्या बंगल्यावर धाडीसाठी वैरागडसोबत गेलेल्या आणखीही दोन कथित पोलिसांचा शोध घेण्यात येत आहे. सुरुवातीला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या काशिमीरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी १० जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर, काशिमीरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा अशा दोन पथकांनी वैरागड आणि सोहेल या दोघांना दीड लाखाच्या रकमेसह रंगेहाथ अटक करून त्यांच्याकडून रिजवान आणि एजाज यांची सुटका केली. प्रकरण ठाणे शहर पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर ते सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर यांच्याकडे तपासासाठी सोपवण्यात आले. आठवडा उलटूनही यातील अन्य दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाही. पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
नंदूरबारच्या व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी : महिलेसह दोघांची अटकपूर्व जामिनासाठी धडपड
By जितेंद्र कालेकर | Published: July 19, 2018 10:44 PM
सेक्सच्या जाळ्यात अडकवून नंदूरबारच्या व्याप-याला खंडणीसाठी ओलीस ठेवल्याचा आरोप असलेल्या महिलेसह दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे.
ठळक मुद्दे दोन लाख दहा हजारांची खंडणी उकळली आणखी दहा लाखांच्या खंडणीसाठी ठेवले ओलीस पोलिसासह दोघांना अटक