मुरबाड: गेल्या आठवड्यात मुरबाड तालुक्यात मृतावस्थेत आढळेल्या मादी बिबट्याचे प्रकरण ताजे असताना बुधवारी वन विभागाला पुन्हा बिबट्याचे एक मृत पिल्लू आढळून आले. येथील सावरणे गावातून वाहणाऱ्या काळू नदीच्या पात्रातील एका कपारीत हे पिल्लू गेल्या तीन दिवसांपासून आईशिवाय वावरत होते. गावकऱ्यांनी तातडीने याची माहिती स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
या ठिकाणी दाखल झालेले वन अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून गावात तळ ठोकून होते. सोमवारपासून आम्ही या पिल्लावर नजर ठेवून होतो. मात्र त्याची आई गेल्या दोन दिवसांमध्ये कुठेच आढळून न आल्याची माहिती टोकवडेचे (दक्षिण) वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी दिली. पिल्लासोबत आई नसल्याची खात्री झाल्यावर सोमवारी अधिकाऱ्यांनी त्याच्या खाण्याची सोय केली. यासाठी कपारीच्या वरच्या बाजूला एक मृत कोंबडी बांधून ठेवण्यात आली होती. शिवाय कपारीमध्ये मटणाचे काही तुकडेही ठेवण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांमध्ये पिल्लाने एकदाही दिलेल्या खाद्याला हात न लावल्याचे मांजरे यांनी सांगितले. त्याची हालचाल टिपण्यासाठी या ठिकाणी 'कॅमेरा ट्रॅप' लावण्यात आले होते. त्यामध्ये त्याचा वावर टिपला जाता होता. त्यानुसार हे पिल्लू शाररिक दृष्ट्या सुदृढ वाटत होते. मात्र दोन दिवस त्याने काही न खाल्याने आणि आईचाही आसपास ठावठिकाणा नसल्याने त्याला जेरबंद करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. यासाठी सर्व तयारी पूर्ण करुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव पथकाला बुधवारी सकाळी पाचारण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे ६.३० वाजता परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कपारीजवळ गेलेल्या वनसरक्षकाला हे पिल्लू मृतावस्थेत आढळले. या ठिकाणी दाखल झालेल्या बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी पिल्लाचे मृत शरीर शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. त्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून करण्यात आली.