लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली वैभव शिंदे (३६) याच्यासह आठ जणांची फसवणूक करणा-या वसीम ऊर्फ शाहीद शेख (२८, रा. मानखुर्द, मुंबई) आणि राकेश गुप्ता ऊर्फ वरुण गुप्ता (३७, रा. मुंब्रा) या दोघांना नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून पेटीएम मशीनसह नऊ मोबाइल, १३ सीमकार्ड आणि एक संगणक संच असा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.नौपाड्यातील दादा पाटीलवाडी येथे व्हरटेक्स एंटरप्रायजेस या नावाने शाहीद शेख याने खासगी सेवायोजन कार्यालय थाटले होते. कुर्ला येथील वैभव शिंदे (३६) याच्यासह आठ बेरोजगार तरुणांकडून त्याने नोकरीसाठी पैसे उकळले होते. शाहीद शेख, स्नेहल, खुशी आणि प्रेम या चौघांनी शिंदे याच्यासह अनेक तरुणांना नोकरीला लावण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून पाच ते १० हजारांपर्यंतची रक्कम घेऊन ६८ हजार २५० रुपयांची फसवणूक केली. कोणालाही नोकरीला न लावता त्यांनी या बेरोजगारांचे पैसेही परत केले नाही. शिवाय, अचानकपणे हे खासगी प्लेसमेंट बंद करून पलायन केले. ३१ आॅक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये फसवणुकीचा हा प्रकार घडला. याप्रकरणी शिंदे याने २६ नोव्हेंबर २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार महेश भोसले, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ, गोविंद पाटील आणि भागवत थविल आदींच्या पथकाने २९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वसीम आणि राकेश या दोघांना अटक केली. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रोख भरणा करण्यासाठी पैसे उपलब्ध नव्हते, अशा तरुणांकडून या ठकसेनांनी चक्क पेटीएमच्या माध्यमातून पैसे उकळले. ते पेटीएम स्वॅप करण्याची मशीन, १३ वेगवेगळ्या कंपन्यांचे सीमकार्ड, एक संगणक संच आणि नऊ मोबाइल त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत. या टोळीतील प्रत्येकजण वेगवेगळ्या नावांनी वावरत होता. त्यांच्या अन्य तीन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नोकरीचे आमिष दाखवून ठाण्यातील तरुणांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 10:05 PM
मोठ्या पगाराची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणा-या वसीम ऊर्फ शाहीद शेख आणि राकेश गुप्ता या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. ज्यांच्याकडे रोख भरणा करण्यासाठी पैसे उपलब्ध नव्हते, अशा तरुणांकडून या ठकसेनांनी चक्क पेटीएमच्या माध्यमातून पैसे उकळले. ते पेटीएम स्वॅप करण्याची मशीन, एक संगणक संच आणि नऊ मोबाइल त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत.
ठळक मुद्देवसुलीसाठी पेटीएमचाही वापर नऊ मोबाइल, १३ सीमकार्डही हस्तगतनौपाडा पोलिसांची कारवाई