ठाणे : ठाण्यातील धर्मवीर नगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीच्या पाठी मागील बाजूला असलेल्या ड्रेनेजच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आगीचे लोळ गेले होते. तर, या स्फोटामुळे शेजारी फटाके फोडत असलेल्या मुलांपैकी दोघेजण भाजल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे याचा अधिक तपास करीत आहे. ठाण्यातील धर्मवीर नगर येथे बीएसयूपी प्रकल्पातील नव्याने बांधण्यात आलेल्या शिवकृपा हैसिंग सोसायटीच्या मागील बाजूस ड्रेनेजच्या दोन टाक्या आहेत. त्यात मंगळवारी रात्रीच्यावेळी इमारतीतील काही मुले त्या ठिकाणी फटके फोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक ड्रेनेजच्या दोन्ही टाक्यांचा स्फोट झाला. यावेळी ड्रेनेजच्या टाक्यांवर बसविण्यात आलेली झाकणे सुमारे 12 फूट उंच उडाली. तर, चौथ्या मजल्यापर्यंत आगीचे लोंढे गेल्याची माहिती स्थानिकांनी व प्रत्यक्षदर्शींनी दिली. तर, या स्फोटामुळे जवळच खेळत असलेली विहंग विचारे 8 वर्षे व आर्यन गुरव 12 वर्षे ही दोन मुले भाजली असून त्यांच्यावर वसंत विहार येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याच अधिक तपास पोलीस करीत आहेत.