Thane Crime news: २१ वर्षीय तरुण नातेवाईकाच्या घरी हळदीच्या कार्यक्रमाला गेला. पण, तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर तीन दिवसांनी त्याचा मृतदेहच भातसा नदीत आढळून आला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली आणि त्यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपास सुरू केला. अखेर पोलीस ज्यांनी हत्या केली त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर या हत्येच्या कारणाचा उलगडा झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शहापूर येथील शिल्लोत्तर गावातील बाळू वाघ (वय २१) तरुण वीटभट्टीवर काम करायचा. २५ मार्च रोजी तो नातेवाईकाकडे हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता; पण रात्री उशिरापर्यंत घरी आलाच नाही. त्यामुळे त्याच्या आजीने शहापूर पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दिली.
बाळूचा नदीत सापडला मृतदेह
पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच २८ मार्च रोजी बाळूचा मृतदेह कासगाव हद्दीत भातसा नदीमध्ये सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पण, उपजिल्हा रुग्णालयात फॉरेन्सिक तज्ज्ञ नसल्याने मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला.
हेही वाचा >>फोनवर गर्लफ्रेंडशी बोलता बोलता झालं भांडण, नंतर १८ वर्षांच्या तरुणानं...
२९ मार्च रोजी पोलिसांना बाळूच्या मृत्यूचा रिपोर्ट मिळाला ज्यामध्ये बाळूचा मृत्यू नैसर्गिक नाही. त्याला धारदार शस्त्राने भोसकले असल्याचे म्हटले होते.
पोलिसांनी दोन मुलांना कसं शोधले?
हत्या झाल्याचे रिपोर्टमधून समोर आल्यानंतर पोलिसांनी हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बाळूच्या काकाकडे चौकशी केली. त्यांनी सांगितले की, हळदीच्या कार्यक्रमात बाळूचा दोन मुलांसोबत वाद झाला होता.
पोलिसांनी त्या दोन्ही अल्पवयीन मुलांची चौकशी केली. त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. २५ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता नाचत असताना धक्का लागला आणि त्यांचा वाद झाला. त्यानंतर दोघांनी बाळू मंडपाच्या मागच्या बाजूला नेले आणि मारहाण केली. एका मुलाने बाळूच्या गळ्यात चाकू भोसकला.
त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह दुचाकीवर ठेवला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह कासगावच्या हद्दीतून वाहणाऱ्या भातसा नदीत फेकून दिला. पोलिसांनी दोन्ही विधिसंघर्षग्रस्तांना ताब्यात घेतले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.