लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण दगावण्याच्या घटना सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात २३, तर सोमवारी ४ रुग्ण दगावल्यानंतर मंगळवारी आणखी दोघांची भर पडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे मृतांचा आकडा हा २९ झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता संपली असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे, परंतु मागील आठवड्यात घडलेल्या घटनेनंतर आजघडीला ५०० बेड्सपैकी ४९१ बेड फुल्ल असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने येथील शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे काही बेड शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. एकूणच रुग्णालयावर मोठा ताण आहे.
सिव्हिलचे आयसीयू बेड फुल्ल
- ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयसीयूचे ४८ बेड फुल्ल होते, तसेच इतर ५०० फुल्ल झाले होते. त्यात घडलेल्या मृत्यूच्या तांडवानंतर कळवा रुग्णालय आणि सिव्हिल रुग्णालयात समन्वय साधण्यात आला. त्यानंतर, कळवा रुग्णालयाकडून सिव्हिल रुग्णालयात आयसीयूचे ५ रुग्ण पाठविण्यात आले, परंतु सिव्हिल रुग्णालयाचे आयसीयूचे बेडही फुल्ल झाल्याची माहिती पुढे आली.
- सिव्हिल रुग्णालयात २४ बेड होते, परंतु रुग्ण वाढत असल्याने, त्याची क्षमता ३६ एवढी करण्यात आली. त्यात १२ प्रसूती, १२ मेडिकल आणि १२ सर्जरीचे बेड आहेत, परंतु आता त्याची क्षमता संपल्याने, त्यांनीही नवीन आयसीयूचे रुग्ण पाठवू नका, असे सांगितले आहे.