अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहर लगतच्या व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या परिसरात मागील काही वर्षांत वेगाने नागरीकरण होत आहे. या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी मानपाडा पोलीस ठाण्यावर आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील मानपाडा पोलीस ठाणे ते शिळफाटा हद्दीत मोठ्या प्रमाणात बार रेस्टॉरंट आहेत. तसेच नव्याने होणाऱ्या बांधकामांमुळे येथे मजूरही देशातील विविध भागातून येत आहेत. एकूणच या पोलीस ठाण्याची हद्द मोठी असल्याने कायदा सुव्यस्थेवरही ताण पडत आहे. त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून काटई व दिवा या दोन नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी, अशी मागणी पोलीस प्रशासन व राजकीय नेते मंडळी करत आहेत.
डोंबिवली व परिसराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांच्या आसपास आहे. डोंबिवलीत पश्चिमेला विष्णूनगर, तर पूर्वेला टिळकनगर, रामनगर, मानपाडा अशी ही चार पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांपैकी मानपाडा पोलीस ठाण्याचा पसारा मोठा आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी संकुल, एमआयडीसीतील कंपन्या, निवासी विभाग, हॉटेल व्यवसाय, गाड्यांचे गॅरेज, अन्य छोटे मोठे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. परिणामी तेथील कर्मचाऱ्यांवर तुलनेने कामाचा ताण अधिक आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे विभाजन व्हावे अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था राखली जावी, यासाठी वाढत्या लोकसंख्येनुसार पोलीस ठाणी वाढवणे गरजेचे असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे.
----------------------
दिवा, काटई या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे असावेत, अशी मागणी मी सातत्याने अधिवेशन कार्यकाळात केली होती. त्यानुसार दिवा येथे स्वतंत्र पोलीस चौकी लवकरच करण्यात येणार आहे. मात्र, या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता तत्काळ होणे गरजेचे आहे.
- सुभाष भोईर, माजी आमदार
------------
दोन्ही अधिवेशन काळात आणि सातत्याने मी काटई, दिवा, दावडी या ठिकाणी पोलीस ठाणे, हवे अशी मागणी मी केली आहे. या ठिकाणी मानपाडा आणि डायघर ही दोन पोलीस ठाणे सध्या येतात. पण त्या दोन्ही पोलीस ठाण्यात सुमारे सात किलोमीटरचे अंतर आहे. तर, उल्हासनगर दिशेने १४ किलोमीटरवर पोलीस ठाणे आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस ठाण्यांची गरज आहे. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या भागातील महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- राजू पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण
-------------------