ठाणे : ५९व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत यावर्षी प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिके पटकवणारी किंबहुना चमकदार कामगिरी करणाऱ्या निवडक संस्थेच्या दोन अंकी नाटकांचे प्रयोग अभिनय कट्टानाट्य महोत्सव २०१९ च्या माध्यमातून शनिवार दि २८ डिसेंबर २०१९ व रविवार दि २९ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित केले होते.
नाट्यमहोत्सवाचे उदघाटन जेष्ठ लेखिका वसुधा सहस्त्रबुद्धे, वनिता देशमुख व लेखक सुरेंद्र दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी 'मी जात टाकली' 'आषाढ बार' आणि ' शीमा' ह्या दर्जेदार नाट्यकृतींनी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले.एकाच दिवशी तीन विविध विषयांवरील नाट्याविष्कार अभिनय कट्ट्यावर अनुभवायला मिळाले.या दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली. नाट्य महोत्सवाची सुरुवात वितीन भास्कर यांची संकल्पना व दिग्दर्शन आणि संदीप जंगम यांचं लिखाण असणाऱ्या मी जात टाकली या नाटकाने झाली. आज आजूबाजूला सर्वत्र जातीचे राजकारण होत आहे याच विषयाला धरून हि कथा आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेत्या झालेल्या एका महिला धावपटूच्या जातीचा फायदा आपल्या पक्षाला कसा करून घेता येईल यामागचा प्रवास म्हणजे हे नाटक. आषाढ बार म्हणजे चार महत्त्वाच्या लेखकांचा, त्यांच्या भावभावनाचा, त्याच्या स्वतःच्या काळातील आव्हानांचा आणि स्टाईल चा केलेला नाट्यमय उहापोह.कालिदास,शुद्रक, मोहन राकेश असे काळाच्या पटावरील महत्त्वाचे लेखक आणि सिद्धार्थ नावाचा आजचा लेखक ह्यांना चर्चेला एका बार मध्ये एकत्र आणण्याचा घाट सूत्रधार घालतो. मोहन राकेशाना आषाढ का एक दिन मध्ये त्यांनीच चितारलेल्या कालिदासाला काही सांगायचे आहे, त्यांना आज त्यांनीच रंगवलेल्या कालिदासाचे व्यक्तिमत्व आणि त्यातले काही मुद्दे ह्यांचे पुनरावलोकन करावेसे वाटत आहे ,आपल्याच कलाकृतीचे विश्लेषण करून, खोदून , कालिदासाला काही प्रश्न विचारण्याची इच्छा आज होतेय आणि ह्यातूनच रंगतो एक विलक्षण नाट्यानुभव !! म्हणजे श्रीकला संस्कार, डोंबिवली प्रस्तुत मकरंद साठे लिखित आणि राजन वाडेकर दिग्दर्शित 'आषाढ बार'. राज्य नाट्य स्पर्धेत ठाणे विभागातून प्रथम आलेल्या 'शीमा'.ह्या नाटकाने नाट्य महोत्सव २०१९ मध्ये रसिक प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. *राहुल सिद्धार्थ साळवे आणि वैभव पांडुरंग सातपुते ह्यांच्या लेखणीतून अवतरलेली ही गोष्ट वैभव पांडुरंग सातपुते ह्यांच्या नजरेतून रंगमंचावर अवतरली आणि तो रंगमंच आणि वातावरण मंत्रमुग्ध करून गेली. आजच्या एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानात प्रगती करणाऱ्या भारतातही खेड्यापाड्यात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांची होणारी अवहेलना आणि मुस्कटदाबी आणि त्याबद्दलची मानसिकता.चालीरीती रितिभाती ह्या नावाखाली स्त्रियांचे होणारे शोषण आणि कुठेतरी स्त्रियांच्या मनात त्यांच्या नजरेत एक वेगळ्या सीमेचा शोध चालू राहतो आजची परिस्थिती आणि ती सीमा ह्यातील स्त्रियांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा नाट्यविष्कार म्हणजे 'शीमा'. सीमा नावाच्या वयात आलेल्या एक चिमुरडीच्या तारुण्याची चाहूल लागलेल्या ह्या कोवळ्या जीवाच समाजातील रितीभाती आणि पुरुषप्रधान संस्कृतीने केलेली अवहेलना आणि त्यातून तिच्यावर उमटलेले पडसाद ह्याचा प्रवास म्हणजे 'शीमा'.शीमा हा नाट्यविष्कार म्हणजे देशातील असंख्य शीमांची एक आर्त हाक आहे तिला वाट करून देण्याचं काम लेखक आणि दिग्दर्शकांनी खूप सुंदररित्या केले आहे. तर दुसऱ्या दिवशी कालपुरुष, गोदो वन्स अगेन आणि कबूल है या नाट्याविष्कारांनी गाजविला. अभिनय नाट्यमहोत्सव २०१९ दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली एक आगळ्या वेगळ्या कलाकृती च्या सादरीकरणासोबत कालपुरुष १४ ते १५००० वर्षांपूर्वीचा एखादा मानव तुमच्या सोबत तुमच्या सारखाच उभा ठाकला आणि तुमच्या सोबत इतिहास उलगडू लागला तुमच्या विचारापालिकडाचे तत्वज्ञान तुमच्या समोर सिद्धहस्ते मांडू लागला तर उलगडत जाणारे मानवी विचारांचे अभूतपूर्व कोलाज म्हणजे एम्पीरिकल फॉउंडेशन प्रस्तुत डॉ.संजय रणदिवे लिखित आणि सुदर्शन पाटील दिग्दर्शित कालपुरुष. दुसरा नाट्यविष्कार गोदो वन्स अगेन गोदोचा शोध दीदी आणि गोगो ह्या दोन अवलियांचा गोदो चा शोध.एक ध्येय पण ते गाठता गाठता अनेक अडथळे अनेक प्रश्न अनेक समज गैरसमज निर्माण होतात त्यातून निर्माण होतात अनेक समस्या त्या समस्यांचा मूळ समजून न घेता आपण नष्ट करून टाकतो ध्येयाचा मार्ग आणि मग पुन्हा सुरुवात शून्यापासूनच ह्या प्रवासाची सुरुवात आणि तो शून्य हा प्रवास म्हणजेच श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास संघ आणि इप्सित नाट्यसंघ प्रस्तुत भगवान हिरे लिखित वैभव महाडिक दिग्दर्शित गोदो वन्स अगेन. नाट्यमहोत्सवाचा शेवटचा नाट्यविष्कार म्हणजे राजन खान ह्यांच्या कथांचा कोलाज.सुप्रसिद्ध लेखक राजन खान ह्यांच्या कथांमधील काही प्रसंग पात्र ह्यांच एक सुरेख कोलाज म्हणजे तिहाई कला साधक संस्था प्रस्तुत डॉ.समीर मोने लिखित आणि मिलिंद अधिकारी दिग्दर्शित कबूल है. एक सुप्रसिद्ध लेखक त्याच्या स्त्रीप्रधान कथा आणि त्यातील स्त्रिभुमिकांच्या प्रेमात पडलेली एक वाचक त्या कथा तिच्या आयुष्यात जगण्याचा तिचा हट्ट आणि तिच्यावर कथा लिहण्याचा अट्टाहास याचा प्रवास म्हणजे कबूल है. आणि ह्या प्रवासात मांडलेल्या राजन खान ह्यांच्या कथा एक अविस्मरणीय प्रवास. प्रयोगासाठी हक्काचं रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व नाटकांच्या संचानी तसेच सहा वेगवेगळ्या विषयांची नाटके पाहून शनिवार रविवार खूपच खास झाल्यामुळे उपस्थित ठाण्यातील रसिक प्रेक्षकांनी सुदधा अभिनय कट्ट्याचे आभार मांनले. अभिनय कट्टा नाट्यमहोत्सव २०१९ खर्च एक सुंदर अनुभव.आपल्या कलाकृतीला रंगमंच मिळाला म्हणून रंगकर्मीच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आठवडयाभराचा क्षीण दूर करण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांच्या समोरची सहा दर्जेदार आणि वेगवेगळ्या नाटकांची पर्वणी आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान एक रंगकर्मी म्हणून मला सुखावून गेला.आशा नवोदित आणि हौशी कलाकारांच्या पाठीशी अभिनय कट्टा सदैव उभं राहणार कारण ही चळवळ अशीच निरंतर चालू ठेवने ही एक रंगकर्मी म्हणून आपली जबाबदारी आहे,असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.