जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पुणे जिल्ह्यातील चाकण तळेगाव राष्टÑीय महामार्गावरून जाणा-या एका टेम्पो चालकाला चॉपरच्या धाकाने धमकावून त्याच्याकडील मालासह टेम्पोची लूट करून पळालेल्या पाच पैकी दोघा दरोडेखोरांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने बुधवारी संध्याकाळी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून टेम्पोसह १२ लाख ३५ हजारांचा ऐवजही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्याच्या वागळे औद्योगिक वसाहतीमध्ये स्वस्त दरामध्ये सिगारेटचा कच्चा माल विक्रीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांना मिळाली होती. तिच्या आधारे बुधवारी दुपारच्या सुमारास रणावरे यांच्यासह उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार, जमादार बाबू चव्हाण, हवालदार दिलीप तडवी, राजेंद्र गायकवाड, मनोज पवार, सागर सुरळकर आणि आर. आर. पाटील यांच्या पथकाने अनिलसिंग दुधानी (२३, रा. भीमनगर, अंबरनाथ, जिल्हा ठाणे) आणि अनिल अहिरे (२६ रा. अंबरनाथ) या दोघांनाही ठाण्याच्या वागळे इस्टेट रोड क्रमांक ३० येथून सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडील सखोल चौकशीमध्ये मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी तळेगाव - चाकण मार्गावर चॉपरच्या धाकावर लूट केल्याची कबूली दिली. पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधून एका नामांकित कंपनीतील सिगारेटचा कच्चा माल घेऊन निघालेल्या टेम्पोचा अनिलसिंग दुधानीसह पाच जणांच्या टोळक्याने कार आणि दुचाकीने पाठलाग केला. हा टेम्पो शिक्रापूरमार्गे चाकण तळेगाव महामार्गावर निर्जनस्थळी आला असता, त्यांनी टेम्पोचा चालक समाधान उर्फ संभाजी चव्हाण (३५, रा. फडतरेवाडी, सातारा) याला चॉपरच्या धाकाने म्हाळूंगे (ता. राजगुरुनगर, जि. पुणे) याठिकाणी अडविले. नंतर त्याला बांधून त्याच्याकडील अर्धा तोळे सोन्याची अंगठी, मोबाईल आणि मालासहित टेम्पोही हायजॅक केला. या लुटीनंतर त्याला लोणावळामार्गे खोपोलीजवळील माथेरान येथे सोडले. तर त्यांच्यापैकी दोघेजण मालाच्या विक्रीसाठी टेम्पोसह ठाण्यात आले. मालाची विक्री करण्यासाठी ते गि-हाईकाच्या शोधात असतांनाच ठाणे पोलिसांच्या जाळयात अडकले. दरम्यान, चालकाला मध्यरात्री रस्त्यावरच सोडल्यानंतर त्याने बुधवारी पहाटेच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे पोलिसांना पुणे ग्रामीणच्या चाकण पोलिसांकडून मिळाली.अटकेतील दुधानी आणि अहिरे या दोघांकडून टेम्पो, टेम्पोतील चार लाख ३१ हजारांचा माल, टेम्पो चालकाचा मोबाइल आणि रोकड असा १२ लाख ३५ हजारांचा ऐवज हस्तगत केला असून त्यांच्या अन्य तीन साथीदारांचा मात्र शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यापूर्वीही लुटीचे गुन्हेआरोपींपैकी अनिल अहिरे याच्याविरुद्ध यापूर्वीही अहमदनगर जिल्ह्यात लुटीचे दोन तर अन्य एक असे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांवरही असेच गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.