ठाणे : कळव्यातील रहिवाशी रिहान खानबंदे (४९) यांच्यासह तिघांवर दहा ते १२ जणांच्या टोळक्याने खूनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या आरोपाखाली तक्की चेऊलकर यांच्यासह १२ जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील तक्रारदार रिहान खानबंदे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाल्याने सर्जिल चेऊलकर आणि रिहान या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
कळव्यातील रहिवाशी रिहान खानबंदे यांच्यासह आयुबली खानबंदे आणि सुमसुदिन उर्फ इलियास खानबंदे यांना २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तक्की फारूख चेऊलकर (५२) सर्जिल चेउलकर, रेहान जुबेर चेऊलकर, शाहबाज तक्की चेऊलकर, सैफ तक्की चेऊलकर, साकीब सिराज लुंगेकर, फरहान तुंगेकर, आयाज कानेकर, मुस्तफा शेख आणि तीन ते चार अनोळखींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आयुबली खानबंदे यांच्या डोक्यावर मारहाण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तर सुमसुदिन उर्फ इलियास खानबंदे याच्या तोंडावर आणि रिहान खानबंदे याच्या हातावर मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रिहान याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे १० ते १२ जणांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सर्जिल चेऊलकर याला पोलिसांनीअटक केली आंहे. दरम्यान, रिहान खानबंदे याच्यासह त्याच्या साथीदारांनीही मारहाण केल्याची तक्रार दुसर्या गटाने दाखल केल्याने याप्रकरणी रिहान यालाही अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.