- राजू काळे
भार्इंदर - सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या शरीराच्या अवयवांचा अंदाज ग्रॅडिओमीटरसह मॅग्नोमीटरने दोन ठिकाणी निर्देशित केला असुन तेथील पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे डायव्हर्सच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून आणखी अद्यावत तंत्रज्ञानाचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे तुर्तास पोलिसांच्या हाती काहीही लागले नसले तरी त्यांनी आशा मात्र सोडली नसल्याचे सांगण्यात आले.
वरीष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरने सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची वर्षापुर्वी मीरारोड येथील मुकूंद हाईटस् या इमारतीतील फ्लॅटमध्ये हत्या केली. त्यानंतर बिंद्रे यांच्या मृतदेहाचे राजू पाटील व रमेश पळणीकर यांच्या मदतीने तुकडे करुन ते लोखंडी पेटीत भरले. ती पेटी मीरा-भार्इंदर पालिकेच्या हद्दीतील वरसावे येथील घोडबंदर नदीत त्यांनी फेकली. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना तेथेच सापडल्याने पोलिसांनी या नदीत बिंद्रे यांच्या अवयवांचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दल, भारतीय नौदल व ओशियन सायन्स अॅन्ड सर्व्हिसेस एजन्सीमार्फत मंगळवारपासूनची तिसरी शोधमोहिम सुरु राबविली. मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरु केलेली मोहिम सायंकाळी ७.३० वाजता थांबविण्यात आली. तर बुधवारी पुन्हा सकाळी ११ वाजताच सुरु केलेली मोहिम मात्र दुपारी ४.३० वाजता थांबविण्यात आली. यापुर्वीच्या शोध मोहिमेत पोलिसांनी ग्रॅडियोमीटर या तंत्रज्ञानाचा वापर करुन अवयव व लोखंडी पेटीचा शोध घेतला होता. त्यात एकुण ९ ठिकाणे निर्देशित करण्यात आली. त्यापैकी २ ठिकाणे अतिसंवेदनशील निर्देशित करण्यात आली. मात्र त्या अतिसंवेदनशील ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह असुन वसई-विरार व मीरा-भार्इंदर शहरातील सांडपाण्याचा प्रवाह देखील वाहत असल्याने पाण्यात शोध घेणा-या डायव्हर्सच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच या प्रवाहामुळे तेथे दोन मोठ्या घळी (खड्डे) तयार झाले असुन मोठमोठी दगडे त्याठिकाणी असल्याने तेथील शोधमोहिम धोकादायक ठरली होती. त्यामुळेच मंगळवारपासून सुरु केलेल्या शोधमोहिमेसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता शिंदे-अल्फान्सो यांच्या प्रयत्नाने इराक येथील मॅग्नोटोमीटर या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यानेही ती दोन ठिकाणेच निर्देशित केल्याने पोलिसांनी डायव्हर्सच्दया मदतीसाठी आणखी अदयावत तंत्रज्ञानाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे : ही शोध मोहीम एकाच अधिका-याच्या जबाबदारीवर सुरु असुन इतर अधिकारी मात्र त्यात अप्रत्यक्षपणे अहकार्य करीत आहेत. या शोधमोहिमेसाठी राज्य सरकारने कार्यक्षम अधिकारी त्या अधिका-याच्या मदतीला दिल्यास तपास सत्कारणी लागण्याची शक्यता आहे.