ठाणे : मुंब्रा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस निरीक्षकांनी कोरोनावर मात केली आहे. एकाला रविवारी ठाण्यातील सफायर रुग्णालयातून तर दुसºयाला मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयातून सोमवारी घरी सोडण्यात आले. दोघांचीही कोरोनातून सुखरुप मुक्तता झाल्यामुळे ठाणे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर ते नाशिक येथील घरी गेले होते. तिथे तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना नाशिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. त्यापाठोपाठ मुंब्रा पोलीस ठाण्याचे चार कर्मचारी आणि अन्य दोन अधिकारी अशा सात जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकीच एका निरीक्षकाला दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या होरायझनमधून तर अन्य एकाला रविवारी रात्री घोडबंदर रोडवरील सफायर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी वरिष्ठ निरीक्षकाचीही कोरोनाची चाचणी ही निगेटीव्ह आल्यामुळे त्यांनाही अंधेरीतील सेव्हन हिल्स या रुग्णालयातून घरी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. थेट वरिष्ठ निरीक्षकालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंब्रा पोलीस ठाण्यासह संपूर्ण पोलीस आयुक्तालय वर्तुळात चिंता व्यक्त होत होती. त्यांनीही कोरोनावर मात केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.
दोन पोलीस अधिकाऱ्यांनी केली कोरोनावर मात, पोलिसांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 1:55 AM