डोंबिवली : जमावाच्या बेदम मारहाणीत अनोळखी व्यक्तिचा मृत्यू होण्याची घटना बुधवारी खोणी भागात घडली त्यावेळी बघ्याची भूमिका घेणारे पोलीस शिपाई एच. एम. गरड आणि पोलीस नाईक एस. व्ही. कचवे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्या मारहाणीच्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.गरड आणि कचवे यांनी मारहाण सुरु असताना हस्तक्षेप न करता बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती तपास अधिकारी व मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल्ले यांनी दिली. ते म्हणाले की या घटनेतील तीन आरोपींनाही सोमवारी रात्री अटक केली असून अमित पाटील, सागर पाटील, बाळाराम फरड अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी २५ आॅक्टोबर रोजी नेवाळी भागातून येणाºया ट्रकमध्ये एका अनोळखी व्यक्तिचे कडाक्याचे भांडण झाले होते. ट्रक थांबल्यावर त्याने एका दुकानातून मारहाणीकरिता खराटा घेतला. त्याला दुकानदाराने विरोध केला, त्यावर त्याने दुकानदारालाही खराट्याने मारहाण केली. त्यामुळे जमलेल्यांनी त्या अनोळखी व्यक्तीला बेदम मारहाण केली. त्याने दुसºया टेम्पोने पळण्याचा प्रयत्न केला. त्या टेम्पोला अपघात झाल्याने पुन्हा जमावाने बदडले.जमाव मारहाण करीत असताना ती अनोळखी व्यक्ती जमावातील काहींना हातात मिळेल त्या वस्तूने मारहाण करू लागली. त्यामुळे जमावाने त्याला जबर मारहाण केली. मारहाणीत रक्तस्राव झाल्याने त्याला उपचाराकरिता नेत असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना तपासादरम्यान मृत व्यक्तिकडे चिठ्ठी सापडली. त्यावरुन तो मानसिक आजारावर उपचार घेत असल्याचे उघड झाले.
जमावाच्या बेदम मारहाणीत बघ्याची भूमिका घेणारे दोन पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 5:27 AM