ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी चोरीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी दोन लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी कापूरबावडी आणि श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
वागळे इस्टेट, रतनबाई कम्पाऊंड, शिवाजीनगर येथील रहिवासी सिद्धार्थ मोते यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरांनी ३० हजारांचा आयपॅड आणि लॅपटॉप असा ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची घटना ८ जुलै रोजी पहाटे घडली. दुसरी घटना पिंपळेश्वर महादेव मंदिर, मानपाडा येथे घडली. येथील विजय किसन राठोड यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख ८० हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना ८ जुलै रोजी पहाटे घडली. राठोड यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसामध्ये शहरात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.