जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भंगारात विकलेल्या गाड्यांची पडताळणी न करता त्यांची बेकायदेशीरपणे पासिंग करून राज्य सरकारचा २१ ते २२ लाखांचा कर बुडवल्याप्रकरणी बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाहनांची पडताळणी न करता त्यांचे पासिंग (नोंदणी) केले जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी केलेल्या चौकशीमध्येही अनियमितता आढळली. भंगारातील (स्क्रॅप) वाहनांचीही सर्रासपणे नोंदणी केली असून अशा अनेक वाहनांचा यात समावेश आढळला. यामध्ये बीडचे निरीक्षक भगुरे यांनी आणि श्रीरामपूर उपप्रादेशिक विभागाचे निरीक्षक निकम यांनीही काही एजंटांना हाताशी धरून सुमारे ३४ वाहनांचे नूतनीकरण केल्याचे आढळले. त्यामुळे राज्य सरकारचा सुमारे २२ लाखांचा महसूल बुडाला असून इतरही करांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही अधिकाऱ्यांना २५ सप्टेंबर रोजी भिवंडी युनिटने अटक केली. त्यांची २६ सप्टेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.यात आणखीही अनेक वाहनांचे अशाच प्रकारे बेकायदेशीररीत्या नोंदणीकरण झाल्याची शक्यता असून आणखीही काही अधिकारी यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या दोन अधिका-यांच्या अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला. स्क्रॅप वाहनांची बेकायदेशीररीत्या नोंदणी झाल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे ते म्हणाले. मात्र, तपास सुरूअसल्याने अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.* बड्या कंपनीचा सहभागएका बड्या वाहन कंपनीने त्यांची नवीन वाहने काही कारणास्तव भंगारात काढली. परंतु, ती वाहने पूर्णपणे स्क्रॅप न करता ती अन्य एका पार्टीला विकली. ती विकताना बनावट कागदपत्रे समोर आली. नवीन वाहने समोर असल्यामुळे ती वाहने भंगारातील असल्याची खात्री या अधिका-यांनी केली नाही. याच तांत्रिक मुद्यावर हे अडकल्याचे एका वरिष्ठ आरटीओ अधिका-याने ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे भंगारातील वाहने पुन्हा विकणा-या संबंधित कंपनीवरही कारवाई होण्याची शक्यता या अधिका-याने व्यक्त केली आहे.-
बीड, अहमदनगरच्या दोन आरटीओ निरीक्षकांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: September 27, 2018 10:42 PM
भंगारातील गाड्यांची पडताळणी न करता त्यांची बेकायदेशीरपणे पासिंग करून राज्य सरकारचा २१ ते २२ लाखांचा कर बुडवल्याप्रकरणी बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने नुकतीच अटक केली आहे.
ठळक मुद्देठाणे पोलिसांची कारवाई२१ लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोपसुमारे ३४ वाहनांच्या तपासणीत गैरव्यवहार