ठाणे : शहरातील रखडलेल्या दोन एसआरए प्रकल्पांना गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे ऊर्जितावस्था मिळाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पाठपुरावा केल्यामुळे जवळपास बंद अवस्थेत गेलेले हे दोन्ही प्रकल्प आता लवकरच सुरू होणार असून, रहिवाशांना त्यांचे थकलेले भाडेदेखील डॉ. आव्हाड यांच्या हस्ते धनादेशाच्या माध्यमातून देण्यात आले.
ठाणे शहरातील खोपटच्या ब्राह्मणदेव सोसायटी आणि माजीवड्यातील सम्राट अशोक नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत विकासकामे करण्यात येत आहेत. माजीवड्यामध्ये सुमारे ४५०, तर खोपटच्या ब्राह्मणदेव सोसायटीतील ४५ रहिवासी या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांचे काम थांबले होते. तसेच, रहिवाशांना विकासकाकडून देण्यात येणारे भाडेही मिळाले नसल्याने रहिवासी हवालदिल झाले होते. या दोन्ही वस्तीमधील रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी परांजपे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. परांजपे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून मंत्री डॉ. आव्हाड यांच्या माध्यमातून विकासक आणि रहिवासी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये या प्रकल्पांना तत्काळ सुरुवात करण्यात यावी अन् रहिवाशांना त्यांचे घरभाडे अदा करावेत, अशा सूचना डॉ. आव्हाड यांनी दिल्या. त्यानुसार, शुक्रवारी डॉ. आव्हाड यांच्या हस्ते या रहिवाशांना त्यांच्या घरभाड्याचे धनादेश अदा करण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी कार्यकारी अभियंते नितीन पवार आणि अभियंते राजकुमार पवार यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी डॉ. आव्हाड म्हणाले की, ठाण्यातील अनेक वस्त्यांचा एसआरएमार्फत होणारा विकास थांबला असल्याचे चित्र दिसून येत आहे. खोपट येथील ब्राह्मणदेव गृहनिर्माण संस्था व माजीवडा येथील सम्राट अशोक नगरचे तथागत आणि समभाव गृहनिर्माण संस्था येथील रहिवाशांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी परांजपे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे रहिवासी आणि विकासक यांच्यात चर्चा घडवून हा प्रश्न निकाली काढला आहे. बांधकाम व्यवसायाला गती येत आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन विकासक हे प्रकल्प लवकर पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे.
.....................
वाचली