प्रज्ञा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या रविवारी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीत विद्याधर विरुद्ध विद्याधर असा सामना रंगला असल्याने राजकारण तापले आहे. या निवडणुकीत एकाच नावाचे पॅनल उतरले असले तरी या पॅनलमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी अर्ज मागे घेणार नसल्याचे ठरविल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. त्यामुळे ठाणेकर गट जिंकणार की वालावलकर गट याची चर्चा ठाण्यातील वर्तुळात रंगली आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत विद्याधर ठाणेकर आणि विद्याधर वालावलकर यांचे पॅनल आमनेसामने उभे राहिले आहे. विद्यमान पॅनल आमचे आहे, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. दोन्ही गटांनी आम्ही ‘विद्यमान पॅनल’च्या नावाने निवडणूक लढवत आहोत, असे `लोकमत`ला सांगितले. ठाणेकरांच्या गटाने आपल्या पॅनलमध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी ८० टक्के सदस्यांना रिंगणात उतरवले असून, काही नवीन कार्यकर्त्यांनाही संधी दिली आहे. ठाणेकर यांच्या गटातून ते स्वतः अध्यक्षपदासाठी, तर वालावलकर यांच्या गटातून अरुण करमरकर हे अध्यक्षपदासाठी उभे राहिले आहेत. एकाच पॅनलमधील दोन्ही गट परस्परविरोधात उभे ठाकल्याने निवडणूक चांगलीच रंगणार आहे. ठाणेकर गटाने अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. मात्र वालावलकर गटाने ती मान्य केली नाही, असे ठाणेकर यांचे म्हणणे आहे.
ठाणेकर गटाकडून विद्याधर ठाणेकर (अध्यक्ष), तर कार्यकारी मंडळासाठी विनायक गोखले, वृषाली राजे, केदार बापट, कृष्णकुमार कोळी, निर्मोही फडके, नरेंद्र जोशी, प्रकाश दळवी, निशिकांत महाकाळ; तर वालावलकर गटाकडून अरुण करमरकर (अध्यक्ष) तर कार्यकारी मंडळासाठी
विद्याधर वालावलकर, सीमा दामले, आशा जोशी, डॉ. अश्विनी बापट, संजीव फडके, सुजय पत्की हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
...........
विद्याधर ठाणेकरांनी अध्यक्षपदासाठी उभे राहणे हे गैर आहे. विद्यमान पॅनल ठरविण्याचा अधिकार विद्यमान अध्यक्षाला आहे. करमरकर हे साहित्यिक आहेत. अध्यक्षपदावरील व्यक्ती साहित्यिकच असावा. मी अध्यक्ष झालो तेव्हा परिस्थिती मात्र वेगळी होती.
- विद्याधर वालावलकर
..........
विद्याधर वालावलकर हे साहित्यिक आहेत का? माझी स्वतःची ३५ पुस्तके आहेत. अध्यक्ष हा साहित्यिक असावा, असे कुठेही म्हटलेले नाही. विरोधकांना आता कळले आहे की ते हरणार आहेत. याआधी जे पदाधिकारी होते त्यांतील कितीजण साहित्यिक होते? बहुमत आमच्या बाजूने आहे. साहित्य संमेलन यशस्वी करण्यात माझा मोठा वाटा होता, हे ठाणेकर नागरिकांना चांगलेच माहीत आहे.
- विद्याधर ठाणेकर
......
सन २०१८ मध्ये निवडणूक झाली होती. आता ही निवडणूक येत्या रविवारी होत आहे.
चौकट
उपाध्यक्ष व कार्यवाह या पदांची बिनविरोध निवड झाली आहे.
कार्यवाह (बिनविरोध निवड)
१. चंगदेव काळे २. संजय चुंबळे ३. दुर्गेश आकेरकर
उपाध्यक्ष (बिनविरोध निवड)
१. अरुण म्हात्रे २. हेमंत काणे ३. पद्माकर शिरवाडकर ४. संजीव ब्रह्मे ५. विकास हजरनीस
............
वाचली