- अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची तारेवरची कसरत सुरू आहे. खासगी रुग्णालयांबरोबरच महापालिकेच्या कोविड सेंटरमध्येही आता बेडसाठी वेटिंग राहावे लागत आहेत. अशी परिस्थिती असली तरी ऑक्सिजनअभावी तब्बल दोन हजार ९०० बेड रिकामे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटर, बुश कंपनी आणि व्होल्टास कंपनीमध्येही अशा प्रकारे ऑक्सिजनचे बेड रिकामे असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सौम्य लक्षणे असलेले कोणत्याही स्वरूपाचे रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसून त्यांच्यासाठी भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्र उपलब्ध असून तेथे ६३० रुग्ण दाखल असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची बेडसाठी तारेवरची कसरत आजही सुरू आहे. त्यातही पहिल्या लाटेच्या वेळेस महापालिकेने काही कोविड सेंटर सुरू केली होती. तर काही सेंटर शुभारभांच्या प्रतीक्षेत असून तेथेदेखील ऑक्सिजनचे शेकडो बेड उपलब्ध आहेत. परंतु, त्याठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठाच नसल्याने ते सुरू केले नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. कळवा येथे म्हाडाच्या माध्यमातून ४०० आणि मुंब्य्रात ४१० बेडचे रुग्णालय सुरू केले होते. परंतु, तेदेखील बंद आहे. बुश कंपनीच्या ठिकाणी ६०० बेडचे, बोरीवडे येथे ३००, व्होल्टास कंपनी येथे एक हजार आणि पार्किंग प्लाझा येथे ९०० ऑक्सिजनचे असे दोन हजार ९०० बेड शिल्लक असतांनाही केवळ ऑक्सिजन नसल्याने ते खुले केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान पार्किंग प्लाझा येथे ऑक्सिजन उपलब्ध होईल, असा दावा महापालिकेने केला आहे. त्यानुसार ते उपलब्ध झाल्यास रुग्णांना येथे अतिरिक्त ९०० बेड उपलब्ध होणार आहेत.दुसरीकडे कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणे असलेले आणि अति लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात आहे. तसेच खासगी रुग्णालयातदेखील त्याच धर्तीवर रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. लक्षणे नसलेले ११ हजार ४४५ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. तर महापालिकेच्या माध्यमातून भाईंदरपाडा येथे विलगीकरण केंद्र सुरू केले असून त्याठिकाणी सौम्य लक्षणे असलेले ६३० रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये अशा रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
रिकामे बेड - ९००कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनअभावी पार्किंग प्लाझा कोविड सेंटरचे ८० टक्के बेड रिकामे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दोन कोविड सेंटर सध्या सुरू आहेत. यातील ग्लोबल कोविड सेंटरमध्ये जवळ जवळ सर्वच बेड फुल्ल आहेत. याठिकाणी बेड शिल्लकच नसल्याचे दिसत आहे. जनरल बेड काही अंशी शिल्लक असल्याचे दिसत आहे. परंतु, दुसरीकडे पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये एक हजार १७५ बेड उपलब्ध आहेत. परंतु, त्याठिकाणी ऑक्सिजन नसल्याने सुमारे ९०० बेड रिकामे असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.८० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे, त्यांच्यावर
घरीच उपचारठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत एक लाख ६ हजार ३२४ कोरोना रुग्ण आढळले असून त्यातील ८९ हजार २०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एक हजार ४९१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १५ हजार ६२९ रुग्णांवर सध्या प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू आहेत. यातील ११ हजार ४४५ रुग्ण घरीच विलगीकरणात असून सौम्य लक्षणे असलेले ६३० रुग्णांवर भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात उपचार सुरू आहेत.
सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेतले जात नाही. त्यांना भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात दाखल केले जात आहे. तर ज्यांना कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत, त्यांना घरीच विलगीकरणात ठेवले जात आहे. परंतु, ऑक्सिजनचा अभाव असल्याने कोविड सेंटरमधील काही बेड रिक्त असल्याचे दिसत आहे. - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा