- सदानंद नाईकउल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमाच्या २८ शाळेत ६ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा इमारत दुरुस्ती व पुनर्बांधणीवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही शाळेची दुरवस्था कायम असून केवळ एका वर्षात विद्यार्थ्यांची संख्या २ हजारांनी कमी झाली आहे. याप्रकाराने शिक्षण मंडळातील सावळ््यागोंधळाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळांतर्गत मराठी, हिंदी, सिंधी व गुजराती माध्यमाच्या शाळा आहेत. सिंधी माध्यमाच्या शाळेसह गुजराती व मराठी माध्यमाच्या शाळेला घरघर लागली असून सिंधी व गुजराती माध्यमाच्या प्रत्येकी फक्त एक शाळा सुरू आहेत. तीच परिस्थिती मराठी माध्यमाची झाली असून हिंदी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांची संख्या बऱ्यापैकी आहे. शाळेतील मुलांना शैक्षणिक वर्ष सुरू होते तेव्हा शैक्षणिक साहित्य, गणवेश, बूट, छत्री देण्याऐवजी दिवाळीनंतर दिली जात असल्याने, मंडळ वादात सापडले आहे. मुलांना देण्यात येणाºया चिक्कीवर तब्बल दीड कोटींचा खर्च केला जात असल्याने, महागड्या चिक्कीची चर्चा शहरात आहे. शाळेतील पुस्तकालय व गं्रथालय भंगारात जाऊन त्यातील बहुतांश पुस्तकांची चोरी झाल्याची चर्चा आहे. एकूण शाळेची दुरवस्था झाली असून काही शाळांची पुनर्बांधणी महापालिकेने हाती घेतली आहे.विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन समोरील शाळा नं-१४ इमारतीची ५ कोटींच्या निधीतून पुनर्बांधणी झाली. तसेच खेमानी परिसरातील शाळा इमारतीच्या पुनर्बांधणीला महापालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे. शहर विकास आराखड्यात सदर इमारत रस्त्याच्या मधोमध येत असल्याने, इमारत परवाना वादात सापडला. दोन्ही नवीन इमारतीच्या तळमजल्यावर वाणिज्य दुकाने का बांधली, असा प्रश्न उपस्थित केला जात असून राजकीय नेत्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे शिक्षण मंडळ वादात सापडले आहे. शाळेला पुरवण्यात आलेले निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याचे चित्र आहे. तशीच परिस्थिती इतर सुखसोयींची आहे. कॅम्प नं-४ समरामदास हॉस्पिटल समोरील मराठी शाळेला डिजिटल करण्यात आले होते. मात्र आज त्या शाळेची दुरवस्था झाली आहे. शाळांना सुरक्षारक्षक पुरविण्यात न आल्याने, चोरीच्या प्रकारात वाढ झाली असून शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी शिपाई पुरवण्याची मागणी जुनीच आहे.महापालिकेच्या बहुतांश शाळेला मोठे पटांगण आहे. त्यामुळे मुले विविध खेळ स्पर्धेत चमकत आहेत. त्याचबरोबर मुले व त्यांच्या पालकाचे इंग्रजी माध्यमाचे आकर्षण बघता या शाळांत मुलांची संख्या टिकवण्यासाठी सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू करा, अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी संघटनेने महापालिका आयुक्त, महापौरांकडे वारंवार केली. तसेच गरीब व गरजू मुलांना कमीतकमी इयत्ता दहावीपर्यंत मोफत शिक्षण घेता यावे. म्हणून आठवी ते दहावीपर्यत वर्ग सुरू करण्याची मागणीही संघटनेने केली. मात्र आश्वासनापलीकडे महापालिकेकडून काहीएक उपाययोजना झाली नाही. शाळा इमारत दुरुस्ती, चिक्कीचे वाटप, सीसीटीव्ही कॅमेरे, इमारतीची पुनर्बांधणी, शैक्षणिक साहित्य, पिण्याच्या पाण्याची मशीन, खेळाचे साहित्य आदींच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे.महापालिका शाळेत मुलांची संख्या कमी असताना आठ हजार मुले गृहीत धरून चिक्कीसह शैक्षणिक साहित्य, गणवेश व इतर सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. असा आरोप झाल्यानंतर गेल्यावर्षी मुलांची संख्या आठ हजारावरून सहा हजार दाखवण्यात आली. म्हणजे एकाच वर्षात अचानक दोन हजार मुले कमी कशी झाली? महापालिका कारभाराच्या सोयीसाठी शिक्षण मंडळ मुख्यालयात आणण्याची मागणी जुनी असून तिने पुन्हा जोर पकडला आहे.
एका वर्षात दोन हजार विद्यार्थ्यांनी सोडली शाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 2:44 AM