ठाणे : कासवांची तस्करी करणाऱ्या जय लक्ष्मण मकवाणा (वय ३०) आणि अनिकेत मनोज पुनिबया ऊर्फ बाबा या दोघांना ठाणे वन विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीची दोन कासवेही जप्त करण्यात आली आहेत. त्यांना १६ मेपर्यंत वन विभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील एका नामांकित मॉलच्या परिसरात दोघेजण वन्यपक्षी तसेच प्राण्यांच्या तस्करीसाठी येणार असल्याची टीप ठाणे वन विभागाचे वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे यांना मिळाली होती. त्याआधारे मुठे यांच्यासह वनक्षेत्रपाल एस. डी. डगळे, वनपाल अशोक काटसकर, वनरक्षक संदीप मोरे आणि दत्तात्रय पवार, आदींच्या पथकाने ठाण्याच्या वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन यांच्या मदतीने १३ एप्रिल रोजी ठाण्यातील विवियाना मॉल परिसरात लक्ष्मण आणि अनिकेत या दोघांना सापळा लावून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांच्याकडून दोन कासवेही (स्पॉटेड ब्लॅक टर्पिन) जप्त केली. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ठाणे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. वन्य प्राणी तसेच पक्षी यांची खरेदी-विक्री करणे, बाळगणे आणि पाळणे यांना बंदी आहे. तो कायद्याने गुन्हा आहे. अशा कृत्यांमध्ये भाग घेऊ नये. तसेच वन्यजीवविषयक कोणतीही तक्रार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दरम्यान, या दोघांनी ही कासवे कुठून आणि कोणत्या कारणासाठी आणली होती? त्यांची ते कोणाला विक्री करणार होते? याचीही चौकशी सुरू असून यामध्ये आणखी कोणी सामील आहे का? याचाही शोध सुरू असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.