जितेंद्र कालेकर
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भातसा रोड येथील एका कच्च्या पत्र्याच्या गोदामातून परराज्यातील बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नीलेश सांगडे यांनी शुक्रवारी दिली. या कारवाईमध्ये २६ लाख ८२ हजारांच्या बनावट मद्यासह दोन वाहने जप्त करण्यात आली.
आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसा रोड, बिरवाडी येथे विठ्ठल लकडे यांच्या घराच्या पाठीमागे कच्च्या पत्र्याच्या गोदामात परराज्यातील बनावट गोवा निर्मितीचा मद्याचा मोठा साठा असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन विभागाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप, कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि ठाण्याचे अधीक्षक नीलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक एन. एन. मोरे, दुय्यम निरीक्षक गोविंद पाटील, आर. एस. राणे, आर. बी. खेमनार, जवान ए. एस. कापडे, एस. के. वाडेकर आणि ए. बी. भोसले आदींच्या पथकाने छापा टाकून २६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल २५ ऑगस्ट २०२२ रोजी जप्त केला. यामध्ये विविध नामांकित कंपन्यांचे नऊ लाख ५९ हजार ४० रुपयांचे मद्य, सहा लाख ९३ हजारांचे इतर मद्य, दोन मोबाईल आणि दोन मोटारी तसेच बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री असा मुद्देमाल जप्त केला.