ठाणे : थर्टी फर्स्टच्या तोंडावर परराज्यातून विक्रीकरिता आणलेल्या विदेशी मद्यासह मोटार आणि दुचाकी असा पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्या ठाणे विभागाने क ल्याण तालुक्यातील विठ्ठलवाडी येथून शुक्रवारी जप्त केला. उल्हासनगर येथील राकेश गुल चांदवानी (३०) आणि शशिकांत जयसुख पटेल (२६) या दोघांना ताब्यात घेतले आहे. हे मद्य दादरा व नगर हवेली येथून आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण आणि अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा यांच्या निर्देशानुसार ठाणे विभागामार्फत ठाणे परिसरात परराज्यातील अवैध मद्य येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे वाहनांची तपासणी करताना, संशयित आय-टेन कार आणि अॅक्टिव्हा टू व्हीलर या दोन वाहनांमध्ये परराज्यातील विदेशी मद्य व बीअर यांचा साठा आढळून आला. त्यामध्ये ब्लेंडर्स प्राइड, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, स्मिर्नआॅफ हे विदेशी मद्य, तर बडवायझर व ट्युबर्ग बीअरच्या ७५० मिलीच्या एकूण २३१ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. त्या मद्याच्या साठ्यासह मोटार आणि दुचाकी यांची किंमत आठ लाख ७० हजार १९५ रुपये असल्याची माहिती ठाणे विभागाने दिली. ही कारवाई निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड, जवान राजेंद्र शिर्के, दीपक घावटे, अविनाश जाधव, जगन्नाथ आजगावकर, मोहन राऊत, दीपक दळवी, वाहनचालक सदानंद जाधव या पथकाने केली.