---------------------------------------
ऑनलाइन फसवणूक
डोंबिवली : बँक खातेदारांना ऑनलाइनच्या माध्यमातून लाखोंचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. पिसवली येथील शिवकरण रामकृपाल यांच्यासह अन्य बँक खातेदारांची एकूण चार लाख ८१ हजार ४३२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. १३ जून २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
--------------------------------------
तरुणावर चाकूने वार
डोंबिवली : पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून रोहित धोत्रे, ओमकार आणि नवल्या यांनी राहुल सोनार याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता आयरेगाव, समतानगर झोपडपट्टीत घडली. राहुल याची बहीण दीपा हिने भाऊ राजू याला केलेल्या मारहाणीप्रकरणी तिघांविरोधात तक्रार दिली होती. त्या रागातून तिघांनी राहुलवर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------------
२९ हजारांचा मुद्देमाल लंपास
कल्याण : पूर्वेतील चककीनाका येथील श्रीराम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा जाधव यांच्या भावाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने टीव्ही, सोन्याची अंगठी आणि रोकड असा २९ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------------
उघड्या दरवाजावाटे चोरी
डोंबिवली : पूर्वेतील राजाजी पथ परिसरातील जीवन छाया बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सचिन जैस्वाल याच्या घरात उघड्या दरवाजावाटे आत शिरून चोरट्या घरातील १७ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. ही घटना मंगळवारी सकाळी ८ ते ९ दरम्यान घडली. याप्रकरणी सचिनने दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
----------------------------------------------
घरफोडी: दोन मोबाइल लंपास
डोंबिवली : पूर्वेतील राजाजी पथ येथील जय जय श्रीराम सोसायटीत राहणारे देवेंद्र कामदार यांच्या घराचे सेफ्टी लॅच काढून चोरट्यांनी घरातील १२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------------
चार मोबाइल चोरीला
डोंबिवली : पश्चिमेतील कोपर रोड संतोषी माता मंदिराजवळील सरला अपार्टमेंटमध्ये राहणारे संकेत पेंढारी आणि त्याच्या बाजूच्या घरातील उघड्या दरवाजावाटे चोरट्यांनी घरात घुसून २२ हजार रुपये किमतीचे चार मोबाइल चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० ते ९ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
---------------------------------------------